नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने मोठी भर पडत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 30 हजार 773 नव्या रुग्णांची भर पडली असून 309 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात देशामध्ये 38 हजार 945 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी शनिवारी रुग्णसंख्येत 35 हजार 662 इतकी भर पडली होती तर 281 लोकांचा मृत्यू झाला होता. काल नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी दोन तृतीयांश रुग्णसंख्या एकट्या केरळमध्ये सापडली आहे.
केरळमध्ये काल 19 हजार 352 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 143 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसातील ही कमी रुग्णसंख्या आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 80 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
- कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 34 लाख 48 हजार 163
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 26 लाख 71 हजार 167
- सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 32 हजार 158
- एकूण मृत्यू : चार लाख 44 हजार 838
- देशातील एकूण लसीकरण : 80 कोटी 43 लाख 72 हजार 331 डोस
गेल्या सात दिवसातील कोरोना रुग्णांची आकडेवारी
12 सप्टेंबर- 27,254
13 सप्टेंबर- 25,404
14 सप्टेंबर- 27,176
15 सप्टेंबर- 30,570
16 सप्टेंबर- 34,403
17 सप्टेंबर- 35,662
18 सप्टेंबर- 30,773
राज्याची स्थिती
राज्यातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात काल 3, 391 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 28 हजार 561 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.09 टक्के आहे. राज्यात काल 80 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 699 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 485 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कोरोनाची ही वाढलेली आकडेवारी चिंतेचा विषय बनत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 485 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,14,424 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.