नवी दिल्ली : भारताच्या नव्या नकाशा कायद्यावर आक्षेप घेणाऱ्या पाकिस्तानला परराष्ट्र मंत्रालयानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या अंतर्गत कायदेविषयक बाबीमध्ये हस्तक्षेप करण्याचा पाकिस्तानला काहीच अधिकार नाही, अशा शब्दात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं पाकला तंबी दिली आहे.

 
भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीनं दाखवणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारनं नवा कायदा आणला आहे. त्या कायद्यावर आक्षेप घेत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाकडे दाद मिगितली होती. मात्र भारतानंही रोखठोक भूमिका घेत पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं.

 
भारताच्या नकाशाचं चुकीचं वर्णन करुन त्यात पाकव्याप्त काश्मिर आणि अरुणाचल प्रदेश हा देशाचा भाग नसल्याचं दाखवलं तर दंडाच्या कारवाईसह तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. भारताच्या नकाशाचं चुकीचं वर्णन करणाऱ्यांना 7 वर्षांच्या तुरुंगवासासह शंभर कोटी रुपयांचा दंड ठोठवला जाईल, असं मोदी सरकारच्या नव्या प्रस्तावित कायद्यामध्ये म्हटलं आहे.

 
सरकार लवकरच भौगोलिक माहिती नियमन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. एखादी संस्था तसंच व्यक्तीला अंतराळातून भारताचे फोटो किंवा एअरक्राफ्ट, एअरशिप, बलून तसंच यूएव्हीच्या मदतीने भारतातील जागेसंदर्भात माहिती घ्यायची असेल तर त्यांना सरकारची परवानगी आणि परवाना घेणं अनिवार्य असेल.

 
तसंच गूगलला गूगल मॅप किंवा गूगल अर्थ या सेवेसाठी परवान घेणं बंधनकारक असेल.  देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी भारत सरकार अशा नकाशांवर "संवेदनशील परीक्षण" द्वारे नजर ठेवणार आहे.

 
काय आहेत कायद्यातील तरतुदी?

सुरक्षा परीक्षण प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय कोणतीही माहिती वितरीत करता येणार नाही.

भारतात किंवा परदेशात कोणत्याही प्रकारे भारतीय भौगोलिक माहितीचा प्रसार करणे, वितरीत करणे किंवा प्रसिद्ध करणे हा कायद्याने गुन्हा असेल. कोणत्याही व्यक्तीची माहिती, भारताविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार, प्रसिद्धी किंवा नकाशे, तक्ते यांचे वितरण करणे गुन्हा असेल.

ऑनलाईन वेबसाईट, इंटरनेट इतर किंवा कोणत्याही माध्यमातून राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सीमांसह इतर भौगोलिक रचना चुकीची प्रसिद्ध झाल्यास सात वर्ष जेल आणि एक कोटी रुपये दंड अशी तरतूद आहे.

हा कायदा सध्या भारतीय संस्थांना लागू नसणार आहे, पण कायद्याचे उल्लंघन होत असल्याचं दिसून आल्यास चौकशी आणि कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.