India Rain : देशाच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) झाला आहे. तर अनेक ठिकाणी अद्यापही म्हणावा तसा पाऊस झाला नाही. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, ऑगस्ट (August) महिन्यात पावसानं चांगलीच ओढ दिल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, यावर्षीचा ऑगस्ट महिना हा इतिहासातील सर्वात कमी पावसाच्या ऑगस्ट महिन्यांपैकी एक ठरला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम काश्यपी (Anupam Kashyapi) यांनी दिली. तर महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात उणे 12 टक्के पावसाची नोंद जाली आहे. 


ऑगस्ट महिना कोरडा गेला असला तरी सप्टेंबर महिन्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं दिली आहे.   बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याची माहिती अनुपम काश्यपी यांनी दिली. ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात उणे 12 टक्के पावसाची नोंद महिन्यात झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात उणे 24 टक्के, मराठवाड्यातील सहा जिल्ह्यात उणे 22 टक्के आणि विदर्भातील पाच जिल्ह्यांमधे उणे 14 टक्के पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेला असला तरी सप्टेंबर महिन्यात पावसाची शक्यता असल्याचे काश्यपी म्हणाले. अरबी समुद्रातील मॉन्सूनची शाखा कोकणात पाऊस देण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील मॉन्सूनच्या शाखेकडून विदर्भात पाऊस मिळेल अशी माहिती काश्यपी यांनी दिली.


मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस किती असेल आणि किती कालावधीसाठी असेल हे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र कोणत्या दिशेनं प्रवास करेल यावर अवलंबून असणार आहे. ऑगस्ट महिन्यात निर्माण झालेला पावसाचा बॅकलॉग सप्टेंबर महिन्यात भरुन निघेल का? हे आत्ताच सांगता येणार नसल्याची माहिती अनुपम काश्य यांनी दिली. 


खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर


सध्या महाराष्ट्रात पावसानं दडी मारल्यानं विविध भागात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची (Farmers) खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अशात स्थिती मुंबईसह कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरचा पूर्वीचा असलेला जोरदार पावसाचा जोर आता ओसरला आहे. येत्या रविवारपासून (3 सप्टेंबर) पुढील आठवडाभर म्हणजे 10 सप्टेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचीच  शक्यता जाणवत असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.  सध्या महाराष्ट्रात विदर्भ वगळता दुपारच्या कमाल तापमानातही सरासरी पेक्षा दोन डिग्रीने वाढ झाली आहे. पुढील आठवडाभर म्हणजे कदाचित 10 सप्टेंबरपर्यंत ही स्थिती टिकून राहू शकते. त्यामुळं उष्णतेत झालेली सध्याची अतिवाढ आणि वाऱ्याची शांतता यामुळं खरीप पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची  धडपड सुरु आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : विदर्भ वगळता राज्यात तापमानात वाढ, मुंबईसह कोकणातील पावसाचा जोर ओसरला