Rahul Gandhi : सूरत न्यायालयाच्या निर्णयानंतर खासदारकी रद्द झाल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिल्लीतील तुघलक लेनचा शासकीय बंगला सोडला. राहुल गांधींना सरकारी घर रिकामे करण्याची नोटीस मिळाल्यावर अनेक काँग्रेस नेते आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना आपले स्वत: घर देण्याचा विचार केला. तसं अनेकांनी जाहीरदेखील केलं. अनेक समर्थक आणि चाहते राहुल गांधींना पत्र लिहून त्यांच्या घरात राहण्याची ऑफर देत आहेत. जनतेच्या या प्रेमाला राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपले घर लोकांच्या हृदयात आहे, त्यामुळे आपल्याला कोणत्याही घराची गरज नाही, असे राहुल गांधी म्हणाले. यावर बोलताना राहुल गांधींनी भाजपवरही निशाणा साधला. माझं घर रिकामं करुन भाजपने चांगलं काम केलंय, असं म्हणत टोला लगावला. लोक त्यांना पत्र लिहून त्यांच्या घरी राहण्याची ऑफर देत आहेत. भाजप आणि आरएसएसच्या (RSS)  तिरस्कार पसरवण्याच्या विचारसरणीचा काँग्रेस निर्भयपणे सामना करेल आणि विजयही मिळवेल, असंही पुढे राहुल गांधी म्हणाले. 


'माझं घर तुमच्या हृदयात आहे'


भाजपवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, "भाजपने माझ्यावर अनेक खटले दाखल केले आहेत, त्यांनी मला संसदेतून हाकलले आहे आणि माझे राहते घरही काढून घेतले. पण अशी हजारो पत्रे माझ्याकडे येत आहेत ज्यात लोक लिहितात की राहुल जी, कृपया आमच्या घरी या!, त्यामुळे मी आता असंच म्हणेन की माझे घर घेऊन भाजपने चांगले काम केले आहे. माझं घर चाहत्यांच्या हृदयात आहे, मला कोणत्याही घराची गरज नाही."


राहुल गांधी यांनी यावेळी त्यांच्यावर झालेल्या ओबीसी OBC समाजाबाबतच्या अपमानाच्या आरोपावरही भाष्य केलं. ते म्हणाले, "मी कोणत्याही समाजाविरुद्ध चुकीचे बोललो नाही. मी भारतातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो. मी म्हटल्याप्रमाणे तिरस्काराच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडलं आहे.


दरम्यान राहुल गांधी यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान सोडलं असून ते सध्या त्यांची आई सोनिया गांधी यांच्यासोबत राहत आहेत.


शासकीय बंगला सोडताना राहुल गांधी भावूक 


हा शासकीय बंगला सोडताना राहुल गांधी भावूक झाल्याचं दिसून आलं. सत्य बोलण्याची किंमत मी मोजत आहे, मी भारताच्या आवाजासाठी लढत असून त्यासाठी कोणतीही किंमत चुकवण्यास तयार आहे असं राहुल गांधी यांनी शासकीय निवासस्थान सोडताना म्हटलं आहे. घर सोडताना ते म्हणाले की, "19 वर्षांनंतर मी घर सोडत आहे. हे घर देशातील जनतेचे आहे, मी आता 10 जनपथवर राहणार आहे." त्यांनी लोकसभा सचिवालयाला बंगल्याच्या चाव्या सुपूर्द केल्या.