Pakistan Army Chief On Kashmir : पाकिस्तानमध्ये सत्ता संघर्षातून मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली असताना पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. काश्मीरचा मुद्या सोडवण्यासाठी भारताने पुढाकार घेतल्यास आम्हीदेखील सकारात्मक पावले उचलू शकतो असे बाजवा यांनी सांगितले. पाकिस्तान सर्व प्रकारचे वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात, यामध्ये काश्मीर वादाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
जनरल बाजवा यांनी सांगितले की, जगातील एक तृतीयांश लोकसंख्या ही संघर्षात अडकली आहे. त्यामुळे आपल्या भागात संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेला सीमा तणावाचा मुद्यादेखील आमच्यासाठी चिंतेचा विषय असल्याचे बाजवा यांनी म्हटले. या मुद्यावर चर्चा आणि राजनयिक मार्गाने तोडगा काढता येऊ शकतो असे त्यांनी म्हटले.
वाद सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्दीपणा वाढवणे आवश्यक
'इस्लामाबाद सुरक्षा 2022' ला संबोधित करताना पाकिस्तान लष्करप्रमुख बाजवा यांनी म्हटले की, राजकीय नेतृत्वाने भावनिक आणि संकुचित मुद्यांपेक्षा आता व्यापक हित लक्षात घेत निर्णय घ्यायला हवेत. पाकिस्तान गटांच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. बौद्धिक वादविवादासाठी आपल्याला प्रोत्साहित करावे लागेल. त्याशिवाय जगभरातील काही ठिकाणांचा विकास करावा लागेल. ज्या ठिकाणी अशा चर्चा होतील. आर्थिक आणि राजकीय संकटाच्या गर्तेत असलेल्या असलेल्या पाकिस्तानला इतर आव्हानांचा मुकाबला करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या सुरक्षा धोरणाच्या केंद्रस्थानी आमचे नागरीक आहेत. नागरिकांची सुरक्षा, सुरक्षा, प्रतिष्ठा आणि समृद्धी ठेवणे हे पाकिस्तानचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा धोरण असल्याचे लष्करप्रमुख बाजवा यांनी सांगितले. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी दहशतवादाचा पराभव करण्यासाठी असंख्य बलिदान दिले आहेत. मात्र, दहशतवाद आणि हिंसक अतिरेकींचा धोका अजूनही कायम असल्याचेही त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- भारताचं समर्थन करणारा शक्तीशाली देश पाकिस्तानवर नाराज - इम्रान खान
- Sri Lanka Financial Crisis : श्रीलंकेत आणीबाणी लागू, अर्थव्यवस्था पुरती ढासळली; महागाईमुळे संतप्त जनतेकडून जाळपोळ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha