India Mansoon News : मान्सूनसंदर्भात (Mansoon) आनंदाची बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) याबाबतची माहिती जाहीर केली आहे. गेल्या 24 तासात निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. 


31 मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज


मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात दिलेल्या वेळेत दाखल झाला आहे. 31 मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. साधारणपणे मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो. पण यावर्षी मान्सून एक दिवस आधीच  म्हणजे 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. असं असलं तरी तिन चार दिवस मागे पुढेही होण्याची शक्यता आहे. त्यामुळं 30 मे ते 4 जून दरम्यान मान्सून भारतात येण्याची शक्यता आहे. केरळमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मान्सून हा अंदमान निकोबार बेटांवर येतो. दरवर्षीचा विचार करता अंदमान बेटावर तो 21 मे ला दाखल होत असतो. पण यावेळी तो दोन दिवस आधीच येणार आहे. गेल्यावर्षीही मान्सून अंदमानमध्ये 19 मे ला आला होता. पण केरळमध्ये नऊ दिवस उशिराने आला.


26 मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता


राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होते आहे. कुठं उन्हाचा तडाखा सुरु आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) कहर आहे. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पुढील आठवडाभर म्हणजे रविवार 26 मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याची माहिती हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे.  माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार दिनांक 23 मे पासून तर दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड या 8 जिल्ह्यात अवकाळीची तीव्रता अधिक जाणवणार आहे.  महाराष्ट्रात 27 मे पासून पूर्व-मोसमी गडगडाटीचा वळीव स्वरुपाच्या पावसाची शक्यताही आहे. दरम्यान, या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.     


महत्वाच्या बातम्या:


Unseasonal Rain : विदर्भात अवकाळी पावसाचा जोर कायम; पुढील पाच दिवस नागपूरसह सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी