India G20 Summit 2023: भारत (India) पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. बैठकीत सर्व पक्षांच्या सूचना घेतल्या जाणार आहेत. यावर चर्चा देखील केली जाणार असून याबाबतची रणनीती निश्चित केली जाईल. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या वतीने सुमारे 40 पक्षांच्या प्रमुखांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचीही उपस्थिती असण्याची शक्यता आहे.
देशभरातील 200 हून अधिक ठिकाणी पूर्वतयारी बैठका
जी 20 समिटसाठी आज केंद्र सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. राष्ट्रपती भवन कल्चरल सेंटर येथे संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होईल. संसदेत प्रतिनिधित्व असणाऱ्या पक्षाच्या प्रमुखांना या बैठकीला बोलावण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका शस्त्रक्रियेमुळे या बैठकीला हजर राहू शकणार नसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, भारताने 1 डिसेंबर रोजी अधिकृतपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत या महिन्याच्या सुरुवातीला देशभरातील 200 हून अधिक ठिकाणी पूर्वतयारी बैठका आयोजित करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. माहितीनुसार, आगामी G20 शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
कोण कोण राहणार उपस्थित?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारी दिल्लीत पोहोचणार असून सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बॅनर्जी यांनी मात्र बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिनही या बैठकीत सहभागी होणार आहेत. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे समजते.
"प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब"
इंडोनेशियाने यंदाच्या शिखर परिषदेत आगामी वर्षासाठी G-20 चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचे म्हटले होते. G-20 ही जगातील वीस प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांची संघटना आहे. यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन संघाचा समावेश आहे.
पंतप्रधानांच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचं उद्घाटन करतील आणि बैठकीला संबोधित करतील.
इतर महत्वाच्या बातम्या