LPG Gas Price :  स्वयंपाकासाठीच्या एलपीजी गॅसच्या सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder Price Hike) दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट बिघडले आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे दर कधी कमी होतील, याकडे देशातील सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी (Petroleum Minister Hardeep Singh Puri) यांनी गुरुवारी लोकसभेत याचे उत्तर दिले.


डीएमके पक्षाचे खासदार डॉ. वीरास्वामी कलानिधी यांनी एलपीजी गॅस सिलेंडर दराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. भारतात गॅसचे दर कधी कमी होतील असा प्रश्न त्यांनी लोकसभेत उपस्थित केला. प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाल्यास सरकार एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्याबाबत सरकार विचार करणार असल्याचे त्यांनी म्हटले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात गॅस 750 डॉलर प्रति मॅट्रिक टन इतका दर सुरू आहे. 


केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पुढे म्हटले की, आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर निश्चित होण्यामागे विविध घटक कारणीभूत असतात. आगामी काळात देशात एलपीजीचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी यासाठी सरकारकडून उपाययोजना आखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे एलपीजी गॅसच्या दरात कपात करण्यास मदत होईल, असेही पुरी यांनी सांगितले. 


लोकांच्या मागणीकडे सरकारचे लक्ष


पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले की, देशात सरकार गरीब जनतेकडून होत असलेल्या मागणीबाबत संवेदनशील आहे. सौदी अरेबियात गॅसच्या दरात 330 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकारने त्या तुलनेत फार कमी दरवाढ केली असल्याचे त्यांनी म्हटले. सौदी अरेबियात गॅसच्या दरात घट झाल्यास त्याच्या परिणाम देशातील एलपीजी गॅस सिलेंडर दरातही दिसून येईल, असेही त्यांनी म्हटले. 


व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ 


नव्या वर्षाची सुरुवात महागाईच्या चटक्याने झाली होती. इंधन कंपन्यांनी 1 जानेवारी रोजी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर (LPG Cylinder Price) जाहीर केले. प्रति सिलेंडरमागे 25 रुपयांची दरवाढ ( Price Hike) करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरसाठी लागू करण्यात आली. तर, घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. 


व्यावसायिक वापरासाठी असलेला एलपीजी सिलेंडर 19 किलोचा असतो. तर घरगुती वापरासाठी असलेला एलपीजी सिलेंडर हा 14.2 किलोंचा असतो. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही दरवाढ झाली नसली तरी सामान्य ग्राहकांना एका सिलेंडर मागे किमान एक हजार रुपये मोजावे लागतात. वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे किचन बजेट बिघडले आहे.


देशातील चार प्रमुख शहरातील घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचे दर काय?


दिल्ली - 1053 रुपये प्रति सिलेंडर
मुंबई - 1052.5 रुपये प्रति सिलेंडर
कोलकाता - 1079 रुपये प्रति सिलेंडर
चेन्नई - 1068.5 रुपये प्रति सिलेंडर