India Corona Cases : गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे (CoronaVirus) 16,299 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 19,431 लोकं बरे झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे 1,25,076 सक्रिय रुग्ण आहेत आणि पॉझिटिव्हीटी दर 4.58 टक्के इतका आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
भारतात आतापर्यंत 5,26,879 कोरोना रुग्णांचा मृत्यू
भारतात आतापर्यंत 5,26,879 कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या आजारातून आतापर्यंत एकूण 4,35,55,041 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड लसीचे एकूण 2,072,946,593 डोस लोकांना देण्यात आले आहेत.
मुंबईतही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ; काळजी घेण्याचे आवाहन
मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात शहरात कोविड-19 चे नवीन रुग्ण आढळल्याने शहरात पुन्हा एकदा घबराट पसरली आहे. मुंबईत शेवटच्या दिवशी 852 नवीन कोरोना संसर्गाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे 40 दिवसांनंतर बुधवारी सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोना रुग्णसंख्येत 80% वाढ झाली आहे.
पावसामुळे वाढले रुग्ण
मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या पाहता मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या, "पावसामुळे शहरात विषाणूजन्य जंतूमध्ये वाढ झाली आहे. रुग्णांमध्ये वाढ कशामुळे झाली हे समजून घेण्यासाठी अभ्यास करावा लागेल. रुग्णांमध्ये वाढ पाहता चाचण्या घेतल्या जातात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) बुलेटिनमध्ये असे सांगण्यात आले आहे की, आता शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 545 झाली आहे. एकूण 9,670 मुंबईत गेल्या 24 तासांत चाचण्या करण्यात आल्या आहेत.