Coal India : गेल्या काही दिवसांमध्ये वीजेची वाढलेली मागणी आणि अपुरा कोळशाचा साठा यामुळे संबंध देशभर वीज टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अशातच काहीशी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे भारताने एप्रिल महिन्यामध्ये 662.5 लाख उत्पादन करत नवा विक्रम प्रस्थापित केल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. 


एप्रिलमध्ये भारताचे एकूण कोळसा उत्पादन 661.54 लाख टन होते, असे कोळसा मंत्रालयाने म्हटले आहे. कोल इंडिया आणि त्याच्या उपकंपन्यांनी 534.7 लाख टन कोळशाचे उत्पादन केले. दुसरीकडे, सिंगारेनी कोलरीज कंपनी लिमिटेड (SCCL) आणि कॅप्टिव्ह माइन्सचे उत्पादन गेल्या महिन्यात अनुक्रमे 53.23 लाख टन आणि 73.61 लाख टन होते. 


मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात कोळसा क्षेत्राची एकूण मागणी 708.68 लाख टन होती तर ऊर्जा क्षेत्राची मागणी एप्रिलमध्ये 617.2 लाख टनांवर पोहोचली आहे. कोल इंडियाने या वर्षी एप्रिलमध्ये सर्वाधिक 534.7 लाख टन उत्पादन गाठले आहे, जे 6.02 टक्के इतकी वाढ दर्शविणारं असल्याचं कोळसा मंत्रालयाने म्हटलं आहे.


आधीचे सर्वोच्च उत्पादन एप्रिल 2019 मध्ये 450.29 लाख टन इतके नोंदवले गेले होते. एप्रिल 2021 मध्ये 540.12 लाख टन कोळशाचा याआधीचा सर्वाधिक वापर नोंदवला गेला होता .2020-21 मधील 7,160 लाख टनांच्या तुलनेत 2021-22 मध्ये एकूण कोळसा उत्पादन 7,770.23 लाख टन होते, ज्यामध्ये 8.5 टक्के वाढ नोंदवली गेली.


कोल इंडियाचे उत्पादन 2020-21 मधील 5,960.24 लाख टनांवरून 2021-22 मध्ये 4.43 टक्क्यांनी वाढून 6,220.64 लाख टन झाले. SSCL चे उत्पादन 2020-21 मधील 500.58 लाख टनांच्या तुलनेत 2021-22 मध्ये 28.55 टक्क्यांनी वाढून 650.02 लाख टन झाले. बंदिस्त खाणींच्या बाबतीत, कोळशाचे उत्पादन 2020-21 मध्ये 690.18 लाख टनांवरून 2021-22 मध्ये 890.57 लाख टन झाले.


भारताचा एकूण कोळसा वितरण 2020-21 मध्ये 6,900.71 लाख टनांच्या तुलनेत 2021-22 मध्ये 8,180.04 लाख टनांवर पोहोचला, त्यात 18.43 टक्क्यांची वाढ झाली. CIL ने 2020-21 मध्ये 5,730.80 लाख टन कोळशाच्या तुलनेत 2021-22 मध्ये 6,610.85 लाख टन कोळसा पाठवला.


दरम्यान, ऊर्जा मंत्रालयाने राज्य आणि खासगी क्षेत्रातील युटिलिटीजना भारतातील वीज संकट कमी करण्यासाठी जून अखेरपर्यंत 19 दशलक्ष टन कोळशाचे परदेशातून वितरण सुनिश्चित करण्यास सांगितले आहे, असे रॉयटर्सच्या अहवालात म्हटले आहे.


ऊर्जा मंत्रालयाने राज्य सरकारच्या मालकीच्या युटिलिटीजना 22 दशलक्ष टन कोळसा आयात करण्यास सांगितले आहे आणि खाजगी वीज प्रकल्पांना 15.94 दशलक्ष टन आयात करण्यास सांगितले आहे.30 जूनपर्यंत वाटप केलेल्या रकमेपैकी 50 टक्के, ऑगस्टच्या अखेरीस आणखी 40 टक्के आणि उर्वरित 10 टक्के ऑक्टोबरच्या अखेरीस वितरित करण्याचे सुनिश्चित करण्यासाठी सर्व युटिलिटीजना सांगितले आहे.