Chinese Village New Satellite Images Doklam:  एका बाजूला भारतासोबत लडाखमधील सीमा प्रश्नावर चर्चा सुरू असताना दुसरीकडे चीनची विस्तारवादी भूमिका (India China Tension) कायम असल्याचे समोर आले आहे. भारतासाठी रणनीतिकदृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या 'चिकन नेक' जवळ चीनने आगळीक केली आहे. भूटानच्या बाजूने असलेल्या डोकलामजवळ (Doklam) चीनने एक गाव वसवले असल्याचे संकेत देणारे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. हे फोटो मेक्सर कंपनीने घेतले आहे. मेक्सर कंपनी अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.


डोकलाम ट्राय-जंक्शनवर वर्ष 2017 मध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. जवळपास 73 दिवस तणाव कायम होता. त्यावेळी चीनने डोकलाम भागात रस्ता निर्मितीचे काम हाती घेतले होते. त्यावेळी भूतानने आक्षेप घेत विरोध केला होता. 


नवीन सॅटेलाइट फोटोनुसार,  अमो चू नदीच्या खोऱ्याजवळ चीन गाव वसवत आहे. या ठिकाणचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. त्याशिवाय, चीनने दक्षिण क्षेत्रात तिसरे गाव वसवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. फोटोमध्ये सहा इमारतींचा पाया रचला असल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय, इतर बांधकामेही सुरू असल्याचे फोटोत दिसत आहे. 


अमेरिकन कंपनी मेक्सरने घेतलेल्या सॅटेलाइट फोटोच्या आधारे 'एनडीटीव्ही' ने वृत्त दिले आहे. या सॅटेलाइट फोटोत गावातील प्रत्येक घराच्या दरवाजाजवळ एक कार उभी असल्याचे दिसते. या नव्या फोटोबाबत भारतीय लष्कराने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. 


भारतासाठी धोक्याची घंटा का?


डोकलाम हा भारत-चीन आणि भूतानमधील 'ट्रायजंक्शन' तिन्ही देशांना जोडणारा मध्य भाग आहे. 'चिकननेक' म्हणून ओळखला जाणारा भाग हा पश्चिम बंगालपासून केवळ 42 किलोमीटर दूर आहे. शिवाय, यामुळे सिलीगुडी कॉरिडॉरमधील भारतीय मनुष्यवस्ती असलेल्या जवळपास 35 ते 40 किलोमीटरच्या भागावरही याचा परिणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे, याच बाजूला नेपाळची सीमाही आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीत चीनच्या या रस्त्याचा भारताला सर्वात मोठा धोका आहे.