नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक सकाळी 10.30 वाजता होणार आहे. या दोन देशांदरम्यानची ही 12 वी बैठक असून हॉट स्प्रिंग आणि गोगरा भागातील चीनने आपलं सैन्य माघारी घ्यावी अशी भारताची भूमिका असल्याचं समजतंय. 


जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला या दोन देशांनी वादग्रस्त भागातून आपलं सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु केली होती. तरीसुध्दा या दोन्ही देशांमध्ये तणाव कायम होता. या महिन्यात दोन्ही देशांतील परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यावर एकमत झालं. 


गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याच्या चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीला जवळपास सव्वा वर्ष पूर्ण झालं आहे. मागील वर्षी 15 जून रोजी चीनच्या सैनिकांनी गस्तीच्या वेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत भारताचे 20 सैनिक शहीद झाले होते, तर चीनने केवळ चार सैनिकांचा मृत्यू झाल्याचं कबूल केलं होतं. 


भारत आणि चीन दरम्यान आजची ही 12 वी बैठक आहे. हॉट स्प्रिंग आणि गोगरा या भागातून चीन आपले सैन्य माघार घेणार का याकडे भारताचं लक्ष लागलं असून त्या दृष्टीने आजची बैठक महत्वाची आहे. 


या दोन्ही देशांनी एलएसीवरून आपापले सैन्य माघार घेण्याचं ठरवलं असलं तरी त्या ठिकाणी चीनच्या कुरापती काही कमी होत असल्याचं दिसून येत नाही. गेल्या महिन्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने युद्धाभ्यास केला होता. पॅनगॉंग लेकजवळ अद्यापही चीनचे सैन्य कायम असून त्या ठिकाणी चीनी सैनिकांनी लष्करी तळ उभारला आहे. या ठिकाणी चीनने इंधनाचा साठाही करुन ठेवल्याचं उपग्रह छायाचित्रातून स्पष्ट झालं आहे. 


महत्वाच्या बातम्या :