नवी दिल्ली : बाहेरील देशातील कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याने केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमासेवा 31 ऑगस्ट 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढता कोरोना प्रसार पाहता पुन्हा ही सेवा सुरु करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. DGCA ने जारी केलेल्या परिपत्रकात याबाबत आदेश दिले आहेत.
इंटरनॅशनल कार्गो संचालन आणि डीजीसीएद्वारे परवानगी दिलेल्या विमानसेवेवर हे लागू होणार नाही. त्याबरोबरच डीसीजीएने सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमानसेवेतील अधिकाऱ्यांना काही मार्गांसाठी परवानगी देण्याची अनुमती देण्यात आली आहे.
एअर बबल करार
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी भारताने काही देशांशी हवाई करार केले आहेत. त्याला एअर ब्रीज किंवा एअर बबल असं म्हटलं जातं. केनिया, भूतान, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, युएई, कतार, नायजेरिया, मालदीव, जपान, इराक, जर्मनी इत्यादी अनेक देशांसह भारताने एअर बबल करार केले आहेत. दोन देशांमधील हवाई बबल करारानुसार विशेष आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे प्रतिबंधात्मक परिस्थितीत त्यांच्या एअरलाइन्सद्वारे एकमेकांच्या प्रदेशात ऑपरेट करता येऊ शकते.
एअर बबल म्हणजे काय?
जेव्हा विशिष्ट आंतरराष्ट्रीय परिस्थितीत सर्वच देशांना जगातल्या सर्व देशांबरोबर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक करता येत नाही, तेव्हा व्यापारी किंवा मैत्रीपूर्ण संबंध असलेले दोन देश एकत्र येऊन द्वीपक्षीय करार करतात, त्यानुसार करार करणाऱ्या दोन देशांमध्ये निश्चित केलेल्या तरतुदीनुसार हवाई वाहतूक करता येते. तसंच या दोन देशांदरम्यान विमान वाहतूक करताना, ज्या ज्या देशांच्या हवाई हद्दी वापरायच्या असतात, त्यांचीही सहमती घ्यावी लागते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याकडं मात्र लक्ष लागून आहे.