नवी दिल्ली : जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवं अन्यथा जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे असंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. 


या वर्षाच्या सप्टेंबर अखेर सर्वच देशांनी आपल्या किमान 10 टक्के नागरिकांना लस मिळेल यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. तसेच या वर्षाच्या अखेरपर्यंत जगभरातल्या 40 टक्के लोकांना लस मिळण्याची आवश्यकता आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. येत्या 2022 सालापर्यंत जगभरातील 70 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण व्हावे अशी अपेक्षाही जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. 


 






डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार 132 देशांमध्ये
डेल्टा व्हेरिएंट या जीवघेण्या कोरोनाच्या प्रकाराचा जगभरातील 132 देशांत प्रसार झाला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे याचा अधिक प्रसार होण्या आधीच सर्वांनी काळजी घेऊन यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करायला हवं असं आवाहन करण्यात आलं आहे. 


डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरणासोबतच सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात. त्यामध्ये फेस मास्क, सोशल डिस्टन्सिंग, योग्य आहार, स्वच्छता आणि गर्दीचे ठिकाण टाळणे या गोष्टींचे पालन करण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे. 


महत्वाच्या बातम्या :