मुंबई: चीनच्या सैन्याने 9 डिसेंबर रोजी अरुणाचलच्या (Arunachal Pradesh) तवांग प्रदेशात (Tawang Sector) घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर तो भारतीय लष्कराने हाणून पाडला. आता त्यापुढे जाऊन चीन भारताचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. पण आता सीमेवर नव्हे तर इंटरनेटवर चीन युद्धसदृष्य स्थिती तयार करण्याच्या तयारीत आहे. भारतातील इंटरनेटवर सायबर हल्ला करुन इंटरनेट व्यवस्था ठप्प करण्याचा प्रयत्न चीनी हॅकर्सकडून करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व विभागांना निर्देश देऊन स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल (Standard Operating Protocol- SOP) जारी केला आहे.
चीनने आता सीमेसोबतच सायबर वॉरची तयारी केली आहे. काही दिवसांपूर्वी एम्सचे सर्वर हॅक करण्यात आलं होतं. त्यामधून भारतीयांचा डेटा मोठ्या प्रमाणात चोरीला गेला होता. यामागे चीनी हॅकर्स असल्याचं नंतर उघडकीस आलं होतं. आताही चीन तशाच प्रकारची कृती करण्याच्या तयारीत आहे.
चीनकडून असलेला सायबर धोका लक्षात घेता केंद्र सरकारने सर्व मंत्रालयांना आणि सार्वजनिक कंपन्यांना स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल (Standard Operating Protocol- SOP) जारी केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
Standard Operating Protocol- SOP: काय आहे स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल?
एखाद्या व्यक्तीला त्याने त्याचं काम कशा पद्धतीने केलं पाहिजे, काम करताना काय प्रक्रिया फॉलो केली पाहिजे याची माहिती म्हणजे स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल होय. भारतातील इंटरनेट डेटावर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यानंतर आता केंद्र सरकारने इंटरनेटच्या वापरासाठी स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल जारी केला आहे. त्यामध्ये इंटरनेटचा वापर करताना काय प्रक्रिया फॉलो केली पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं आहे. आयटी कायद्यांतर्गत सर्व नियमांचे पालन करणे, वापर झाल्यानंतर कम्प्युटर बंद करणे, ईमेल साईन इन-आऊट करणे, वेळोवेळी पासवर्ड बदलणे यासह अनेक नियमांचे पालन करणे या गोष्टींचे मार्गदर्शन करण्यात आलं आहे.
Rajnath Singh On India China Clash: भारताचा एकही सैन्य जखमी नाही
अरुणाचल प्रदेमधील तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबर रोजी चिनी सैन्याच्या घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला. जवळपास 300 ते 400 चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. यामध्ये एकही भारतीय सैनिक जखमी झाला नसल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली. चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न केला, त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले असं ते म्हणाले.