नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाही आज (26 नोव्हेंबर) संविधान दिनानिमित्त संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रम होणार असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करणार आहेत. सकाळी 11 वाजता संविधान दिन सोहळा साजरा केला जाईल. या सोहळ्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायुडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित राहतील. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन वाजेपर्यंत कोणतंही कामकाज होणार नाही.

देशभरात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. संविधानाचा स्वीकार करुन 70 वर्ष पूर्ण झाली आहेत. जगभरातील संविधान बारकाईने वाचल्यानंतर, त्यांचा अभ्यास केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला होता. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी तो भारतीय संविधान सभेसमोर मांडला. याच दिवशी संविधानाने तो स्वीकारला. त्यामुळे देशात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो.

संविधान दिनाच्या निमित्ताने देश भरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांमध्येही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यूजीसीने सर्व उच्‍च शैक्षणिक संस्‍थांमध्ये परिपत्रक जारी करुन आज सविंधान दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

कार्यक्रमाची रुपरेषा
सकाळी 11.05 वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाचं संबोधन होणार. यानंतर 11.10 वाजता पंतप्रधान मोदींचं संबोधन होईल. 11.25 वाजता उपराष्ट्रतींचं संबोधन होणार. यानंतर 11.40 वाजता अटल नॅशनल यूथ पार्लमेंट स्कीम पोर्टल लॉन्च केलं जाणार. 11 वाजून 41 मिनिटांनी राज्यसभेचं 250 सत्र पूर्ण झाल्याने एका पुस्तकाचं प्रकाशन होणार. 11.43 वाजता लोकसभा कॅलेंडर 2020 सादर केलं जाईल. हे 'इंडियाज कॉन्स्टिट्यूशन अॅट 70' च्या थीमवर आधारित असेल. 11.45 वाजता भारतीय संविधानाच्या इतिहासावर एका प्रदर्शनाचं उद्घाटन होईल. त्यानंतर 11.47 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद संबोधित करतील.

विरोधकांचा बहिष्कार
दरम्यान या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी घेतला आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्ष तांत्रिकदृष्ट्या अजूनही सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाहीत असला तरी या पक्षानेही संसदेच्या संयुक्त सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे संसदेच्या संयुक्त सभागृहातील सोहळ्यावर बहिष्कार टाकताना सर्व विरोधी पक्ष संसदेतील घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जाऊन सरकारविरोधात निदर्शने करणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक या पक्षांसह शिवसेनेचे खासदारही या निदर्शनांमध्ये सहभागी होणार आहेत.