Jammu & Kashmir : 27 ऑक्टोबर रोजी भारतीय लष्कर (Indian Army) ऐतिहासिक 'श्रीनगर लँडिंग' (Srinagar landing) साजरं करणार आहे. 1947 मध्ये या दिवशी भारतीय लष्कराने श्रीनगरमध्ये उतरून पाकिस्तानी लष्कर आणि अतिरेक्यांच्या तावडीतून काश्मीरला (Kashmir Issue) मुक्त केले होते. म्हणूनच दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी भारतीय लष्कर 'इन्फंट्री दिन' (Infantry Day) म्हणून साजरा केला जातो. विशेष गोष्ट म्हणजे या वर्षी, या दिवशी म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान 'काश्मीर ब्लॅक डे' (kashmir black day)साजरा करण्याची योजना आखत आहे.
यंदा भारतीय लष्कराकडून श्रीनगर विमानतळावर 'इन्फंट्री दिन'च साजरा तर करणार आहेच सोबतच स्काय जंप, हेलिकॉप्टर ऑपरेशन आणि मिग -21 लढाऊ विमानांचे फ्लाय पास्ट देखील होणार आहे.
माहितीनुसार, भारतीय स्वातंत्र्यानंतर लगेचच पाकिस्तानने काश्मीरवर कब्जा करण्याच्या उद्देशाने मोठा हल्ला केला होता. हा हल्ला मुझफ्फराबाद (आता पीओके), उरी, बारामुल्ला, पुंछ आणि नौसेरा सेक्टरमध्ये करण्यात आला होता. या हल्ल्यानंतरच जम्मू-काश्मीरचे राजे हरिसिंह यांनी भारतात प्रवेश करण्याचा करार केला आणि भारताची मदत मागितली होती. त्यानंतरच भारतीय लष्कराची शीख रेजिमेंट हवाई दलाच्या विमानाने श्रीनगर विमानतळावर (त्यावेळी बडगाम) उतरली. पाकिस्तानी लष्कर आणि अतिरेक्यांच्या हल्ल्यापासून लष्कराने प्रथम हे विमानतळ सुरक्षित केले होते. यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याला सर्व भागातून मुजफ्फराबादकडे पळवून लावले होते, यामुळं संपूर्ण जम्मू-काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात जाण्यापासून वाचले होते. म्हणूनच दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी भारतीय लष्कर 'इन्फंट्री दिन' म्हणून साजरा करते.
यंदा पाकिस्तान 27 ऑक्टोबरला 'काश्मीर ब्लॅक डे' साजरा करणार आहे. यासाठी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने स्वतंत्र निधी देखील दिला आहे. सुमारे एक हजार डॉलर्सचा हा निधी देश-विदेशात राहणाऱ्या पाकिस्तानच्या समर्थकांना देण्यात येणार आहे, जेणेकरून सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅक डेचा प्रचार प्रसार करता यावा. याशिवाय पाकिस्तानने आपल्या सर्व दूतावासांना, उच्चायुक्तांना आणि विदेशातील मिशनला 'काश्मीर ब्लॅक डे' करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय त्यांच्या देशाच्या संसद सदस्यांच्या समितीला 25 ऑक्टोबर रोजी 'काश्मीर ब्लॅक डे' साजरा करण्यासाठी देशात आणि परदेशात होणाऱ्या कार्यक्रमांची आणि प्रयत्नांची माहिती देणार आहे.