Agni-1 Ballistic Missile : भारताने अग्नी-1 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं आहे. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ (DRDO - डिफेंस रिसर्च अँड डेवेलपमेंट ऑर्गेनायझेशन) नं अग्नी-1 या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं आहे. गुरूवारी, 1 जून रोजी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडद्वारे अग्नी-1 या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचं प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
अत्यंत अचूकतेनं लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम
ओडिशाच्या किनाऱ्याजवळील बंगालच्या उपसागरातील अब्दुल कलाम बेटावर मोबाईल लाँचरमधून अग्नी-1 क्षेपणास्त्र डागण्यात आलं. या मोहिमेच्या संपूर्ण मार्गावर अत्याधुनिक रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक सिस्टीमद्वारे देखरेख करण्यात आली होती. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ए भारत भूषण यांनी याबाबत माहिती देत सांगितलं की, अग्नी-1 क्षेपणास्त्र अत्यंत अचूकतेनं लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे. अग्नी-1 क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणावेळी सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक बाबींची यशस्वीपणे पडताळणी करण्यात आली.
जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता
जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नी-1 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी उशिरा ही चाचणी घेण्यात आली. सॉलिड इंजिनवर आधारित क्षेपणास्त्राची मारक क्षमता 900 किमीपर्यंत आहे. ओडिशाच्या किनार्याजवळील बंगालच्या उपसागरातील अब्दुल कलाम बेटावर मोबाईल लाँचरमधून या क्षेपणास्त्राचा मारा करण्यात आला. आजच्या मोहिमेच्या संपूर्ण मार्गावर अत्याधुनिक रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक सिस्टीमद्वारे देखरेख करण्यात आली.
शस्त्रास्त्रांची क्षमता वाढवण्यावर भारताचा भर
भारत गेल्या दोन दशकांपासून विविध बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, अचूक-मार्गदर्शित युद्धसामग्री आणि संबंधित व्यासपीठ विकसित करून आपली युद्धकला आणि शस्त्रात्रांची क्षमता वाढवण्यावर भर देत आहे. भारताने 'अग्नी' उपक्रमाअंतर्गत विविध प्रकारची क्षेपणास्त्र विकसित केली आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये भारताने अग्नी-5 या आण्विक-सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. हे क्षेपणास्त्र 5,000 किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकते. अग्नी 1 ते 4 क्षेपणास्त्रांचा पल्ला 700 किमी ते 3,500 किमी आहे आणि ही क्षेपणास्त्र आधीच लष्करात तैनात करण्यात आली आहेत.