I.N.D.I.A Alliance: भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. गेल्या काही दिवसांत विरोधकांच्या इंडिया आघाडीनं देशातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये बैठकांचं आयोजन केलेलं. सर्वात आधी इंडिया आघाडीची बैठक पाटण्यात पार पडली, मग बंगळुरू आणि त्यानंतर मुंबईत पार पडली. इंडिया आघाडीची चौथी बैठक भोपाळमध्ये होणार असल्याचं बोलंल जात होतं, पण आता भोपाळमध्ये बैठक होणार नसल्याचं समोर आलं आहे. इंडिया आघाडीच्या आता मोठ्या बैठका होणार नसून अशा मोठ्या बैठकांना पूर्णविराम देण्याचा निर्णय इंडिया आघाडीनं घेतल्याची माहिती मिळत आहे.
इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठकांना आता पूर्णविराम देण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. चेन्नई, कोलकाता अशा इतर राज्यात आता बैठका होणार नसल्याची माहिती मिळत आहे. आता केवळ समन्वय समिती आणि इतर समित्यांच्या बैठका होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता 13 सप्टेंबरला शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
प्रमुख पक्ष्यांच्या 11 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार
या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आघाडीतील प्रमुख पक्ष्यांच्या 11 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.या बैठकीत त्या त्या पक्षाचे प्रत्येकी एक प्रमुख नेता समितीचा सदस्य असेल इंडिया आघाडीचे जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ते या समितीमार्फत घेतले जातील.
इंडिया आघाडीची एक कॉमन सोशल मीडिया टीम
सोशल माध्यमांवरच्या लढाईत इंडिया आघाडी एकजूट दाखवणार आहे. इंडिया आघाडीची एक कॉमन सोशल मीडिया टीम बनवली जाणार आहे. सोशल माध्यमांवर भूमिकेमध्ये समानता असावी आणि सर्व पक्षांना समान भाव मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवक्त्यांमध्ये समन्वयासाठी सुद्धा एक विशेष समिती बनवली जाण्याची शक्यता आहे.
लोगोचं अनावरण लांबणीवर
इंडिया (I.N.D.I.A) आघाडीच्या लोगोचं अनावरण पुढे ढकलण्यात आलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काही पक्ष नव्याने आलेले आहेत त्यांना ही सहभागी करुन घेतले जाणार आहे. समिती स्थापन झाल्यानंतर त्या समितीत चर्चा होईल, त्यानंतर लोगो फायनल केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. लोगोसाठी एकूण पाच ते सात पर्याय आहेत, हे सर्व लोगो नव्यानं आलेले पक्ष आणि समितीसमोर ठेवले जातील, त्यानंतर यावरती अंतिम निर्णय होईल, असं बोललं जात आहे.