मुंबई : अवघा देश उद्या (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिन (Independence Day 2023) साजरा करणार आहे. उद्या सर्वत्र तिंरगा (Tricolor) पाहायला मिळतील. परंतु राष्ट्रध्वज (National Flag) फडकवण्यासंबंधी कायदा काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? तिरंगा कुठेही फडकवता येतो का? स्वातंत्र्यदिनाच्या आधी या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. सोबतच तुम्ही तुमच्या घराच्या गॅलरीत किंवा बाल्कनीमध्ये तिरंगा लावू शकता का हे देखील या लेखातून सांगणार आहोत.
घरी तिरंगा कसा फडकवायचा?
2002 पूर्वी सामान्य नागरिक फक्त स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकावू शकत होते. पण आता तसं राहिलेलं नाही. आता तुम्ही कधीही आपल्या देशाची शान असलेला तिरंगा फडकवू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल. हे नियम भारतीय ध्वज संहितेत दिलेले आहेत. या भारतीय ध्वज संहिता 2002 च्या भाग-II परिच्छेद 2.2 च्या खंड (11) मध्ये असे सांगण्यात आलं आहे की, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या घरात राष्ट्रध्वज फडकवायचा असेल तर तो दिवस आणि रात्रभर तो फडकवू शकतो. मात्र, ध्वजारोहण करताना ध्वज कोणत्याही प्रकारे फाटणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. चुकूनही फाटला तरी त्याचा अनादर होता कामा नये. या नियमात आणखी एक गोष्टही नमूद करण्यात आली आहे की, घरामध्ये ध्वज फडकवताना हा ध्वज मोकळ्या जागेवर लावावा आणि तिरंग्याच्या वर दुसरा कोणताही ध्वज नसावा.
राष्ट्रध्वज कुठे लावू शकत नाही?
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला बहुतेक लोक त्यांच्या वाहनांवर तिरंगा घेऊन फिरतात हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. परंतु हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि तसं केल्यास तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते. भारतीय ध्वज संहितेनुसार, वाहनांवर फक्त 225*150 मिमी आकाराचे ध्वज वापरले जातील. यासोबतच सामान्य नागरिक आपल्या गाडीवर तिरंगा लावू शकत नाही. ध्वज लावण्याचा विशेष अधिकार काही घटनात्मक मान्यवरांनाच आहे. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, लेफ्टनंट-गव्हर्नर, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, राज्यांचे किंवा केंद्राचे मुख्यमंत्री, भारतीय मिशनचे प्रमुख, परदेशातील पदे, विधानसभेचे अध्यक्ष, प्रमुख भारताचे न्यायमूर्ती केवळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा समावेश आहे. घटनात्मक पदं असलेले हे मान्यवर त्यांच्या वाहनांवर तिरंगा लावू शकतात.
हेही वाचा