Azadi Ka Amrit Mahotsav : 75 स्वातंत्र्यादिनाचं औचित्य साधत भारत (India) यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. केंद्र सरकारने त्यासाठी विविध संकल्पनाही राबवल्या आहेत. हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) अभियान केंद्राकडून चालवण्यात आले आहे. भारतीयांमध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी या योजणेचा शुभारंभ करण्यात आलाय. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्या सर्वांच्या कामगिरीचा उल्लेखही केला जातो, ज्यांचा देशाच्या पायाभरणीमध्ये मोलाचा वाटा आहे. यामध्ये शास्त्रज्ञांचंही तितकेचं मोठं योगदान आहे. शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांच्या अखंड कामगिरीमुळे आज भारताचं जगात नाव कोरलं गेलेय. त्यांच्यामुळे वैज्ञानिक क्षेत्रात भारताला यश मिळालेय. त्याच थोर संशोधक, वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांबाबत जाणून घेणार आहोत....
डॉ. एपीजे अब्दुल कलाम -
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखलं जातं. डॉ. कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला तर 27 जुलै 2015 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. अब्दुल कलाम भारताच्या दोन मोठ्या यंत्रणांचे, अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)चे प्रमुख होते. दोन्ही यंत्रणांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलं होतं. भारताचं पहिलं रॉकेट एसएलव्ही-3 बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही) बनवण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्याशिवाय भारताचं पहिलं क्षेपणास्त्र 'पृथ्वी' आणि त्यानंतर 'अग्नी' क्षेपणास्त्र बनवण्यातही डॉक्टर अब्दुल कलाम यांचं मोलाचं योगदान होतं. अण्वस्त्र कार्यक्रमात भूमिका भारताने 1998 मध्ये जी अण्वस्त्र चाचणी केली होती, त्यातही डॉ. कलाम यांची भूमिका होती
सर सीवी रमन -
28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन परिणामाचा (raman effect)शोध लावला. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये "राष्ट्रीय विज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो. रामन यांना ब्रिटनमधील राजाने सर ही पदवी बहाल केली. तसेच 1930 साली भौतिक शास्त्रातील संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. रविंद्रनाथ टागोरांनंतर नोबेल पुरस्कार मिळवणारे ते दुसरे भारतीय होते. त्यांनी कोलकाता विद्यापीठात 1917-1933 भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. तेथेच त्यांनी भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख पद भूषवले. तसेच 1947 साली ते बंगळुरुमधील रामन संशोधन संस्थेचे संचालक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संशोधन संस्था आणि विद्यापीठांना उभारणीत रामन यांचा मोलाचा वाट होता. त्यांच्या या कामगीरीसाठी त्यांना 1954 साली भारत सरकारकडून भारतरत्न या सर्वौच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 21 नोव्हेंबर 1970 रोजी त्यांचे बंगळुरुमध्ये निधन झाले.
डॉ. अनिल काकोडकर
डॉ. अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध आणि प्रमुख अणुशास्त्रज्ञ आहेत. ते 1996 ते 2000च्या दरम्यान, होमी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक होते. काकोडकर यांनी परमाणू ऊर्जा विभागाच्या अध्यक्षपदासोबत सचिव पदाचेही काम पाहिलये. 1974 आणि 1998 मध्ये भारताकडून करण्यात आलेल्या परमाणू परीक्षणमध्ये काकोडकर यांचा मोठा वाटा आहे. ध्रुव रिएक्टरचं डिझाइन आणि निर्मितीमध्ये डॉ अनिल काकोडकर यांची प्रमुख भूमिका होती. काकोडकर यांना 1998 मध्ये पद्मश्री, वर्ष 1999 मध्ये पद्म भूषण आणि वर्ष 2009 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ होमी जहांगीर भाभा
डॉ होमी जहांगीर भाभा यांनी 1940 मध्ये काही शास्त्रज्ञांच्या मदतीने भारतात अणु ऊर्जा संशोधनावर काम सुरु केले. अणुशक्तीचा वापर हा शांततामय मार्गाने अणुऊर्जेसाठी व्हायला हवा या मतावर ते ठाम होते. अणुऊर्जेसाठी लागणारे युरेनियम भारतात मिळत नाही पण भारतात मुबलक प्रमाणात असलेल्या थोरियमचे रूपांतर युरेनियमध्ये करता येते हे भाभांना माहित होते. त्यांनी यावर काम करायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी जे.आर.डी. टाटांशी संधान साधून मुंबईत टाटा फंडामेंटल रिसर्च सेंटरची स्थापना केली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1948 साली त्यांनी पंतप्रधान नेहरुंच्या सहकार्याने अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. डॉ. भाभांचे अणुऊर्जेमधील संशोधन लक्षात घेता 1955 साली त्यांना आंतरराष्ट्रीय अणुशक्ती परिषदेचे अध्य़क्षपद देण्यात आले. डॉ. भाभांच्या प्रयत्नामुळेच 1956 साली ट्रॉम्बे येथे भारतातलीच नव्हे तर आशियातील पहिली अणुभट्टी 'अप्सरा' उभारण्यात आली. त्यानंतर 'सायरस' आणि 'झर्लीना' या अणुभट्ट्याही उभारण्यात आल्या. या गोष्टी भारताच्या अणुऊर्जा विकासातील एक मैलाचा दगड ठरल्या. विज्ञानाव्यतिरिक्त त्यांना संगीत, चित्रकला आणि नृत्य अशा अनेक विषयात रुची होती. डॉ. भाभा यांना तब्बल पाच वेळा भौतिकशास्त्राच्य़ा नोबेलसाठी नामांकन मिळाले होते पण दुर्दैवाने त्यांना या पुरस्कारापासून वंचित रहावे लागल. त्यांना भारताचा पद्मभूषण हा पुरस्कार प्राप्त झाला. डॉ. भाभांनी भारताच्या रचलेल्या अणुऊर्जेच्या पायावरच भारताने 18 मे 1974 साली पोखरण येथे पहिली अणुचाचणी पार पाडली.
मंजुल भार्गव
गणिताचे नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे द फिल्ड्स मेडल विजेते 40 वर्षीय मंजुल भार्गव (Manjul Bhargava) यांना नंबर थ्योरीचा तज्ज्ञ मानले जाते. आठव्या वर्षी त्यांना गणितामधील फॉर्म्युला तयार केला होता. संत्रे मोजता येत नसल्यामुळे त्यांनी वेगळा फॉर्मुयाल तयार केला. त्यानंतर ते एखाद्या गाडीवर असलेलं फळांचा पिरामिड पाहून त्याची संख्या किती हे सांगू शकत होते. 2001 मध्ये त्यांनी प्रिंस्टन यूनिवर्सिटी (Princeton University) मधून पीएचडीचं शिक्षण घेतलं. त्यावेळी त्यांनी नंबर थ्योरीची 200 वर्ष जुन्या प्रॉब्लमला क्षणात सोडवलं. भार्गवने ब्रह्मगुप्त यांनी संस्कृतमध्ये लिहिलेल्या सिद्धांताला फेमस रयूबिक क्यूबवर लागू केला.
वेंकटरमण रामकृष्णन
रसायनशास्त्रातील कार्याबद्दल वेंकटरमण रामकृष्णन यांचा 2009 साली नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला. राइबोसोमची रचना यावरील संशोधनासाठी इतर दोन वैज्ञानिकांसोबत वेंकटरमण रामकृष्णन यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. 1976 मध्ये त्यांनी एका अमेरिकेतील विद्यापीठातून पीएचडीचं शिक्षण घेतलं. त्याशिवाय कँब्रिज विद्यापीठात त्यांनी काही दिवस मॉलिक्यूलर बायॉलजी विभागासोबत काम केलेय.
विक्रम साराभाई
विक्रम साराभाई (Vikram Sarabhai) यांच्या नेतृत्वामध्ये कॉस्मिक किरणांचे निरीक्षण करण्यासाठी नवीन दुर्बिण तयार करण्यात आली होती. त्यांनी नासासोबत 1975 ते 1976 यादरम्यान सॅटेलाइट टेलिव्हिजन यशस्वी लाँच केले होते. भारत सरकारकडून विक्रम साराभाई यांना पद्म विभूषण आणि पद्म भूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.