Rank Of India In Global Indices : सध्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनाची लगबग सुरु झाली आहे. देशभरात प्रत्येकजण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दणक्यात साजरा करणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी विविध संकल्पनाही राबवल्या आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात भारताने विविध क्षेत्रात लौकिक मिळवलं आहे. भारत सध्या जगातील सर्वात मोठी बाजारपेठच नाही तर जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणूनही पुढे आलाय.  अनेक  क्षेत्रांमध्ये भारताने विकसित देशांना पछाडलं आहे तर काही देशांना टक्कर देत आहे. तर काही क्षेत्रांमध्ये भारताला आणखी पुढे येण्याची गरज आहे. प्रत्येकवर्षी जारी करण्यात येणाऱ्या विविध क्षेत्रातील निर्देशांकाच्या सुचीमध्ये भारताने काही ठिकाणी चांगली प्रगती केली आहे तर काही ठिकाणी सुधार होण्याची गरज आहे. या लेखात आपण विविध निर्देशांकामध्ये भारताची स्थिती काय आहे? ते पाहूयात... 


ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स - 
यामध्ये भारताचा क्रमांक अतिशय कौतुकास्पद आहे. जगातील विविध विकसित देशांना भारताने मागे टाकले आहे. अमेरिका आणि चीन या देशानंतर भारताचा या यादीत तिसरा क्रमांक लागतो. केंद्र सरकारकडून तरुणांसाठी स्टार्टअपला विषेश मदत दिली जाते, त्यामुळेच भारतामध्ये यूनिकॉर्न कंपन्यांची संख्या वाढत आहे.  


ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्स - यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोजगार आणि देशाच्या विकासासाठी हा निर्देशांक दिलासादायक आहे. यामध्ये भारताच्या पुढे फक्त चीन आहे.  


लष्करी सामर्थ्य निर्देशांक (अल्टीमेट मिलिट्री स्ट्रेंग्थ इंडेक्स) - लष्करी सामर्थ्यांमध्ये भारतचा जगात चौथा क्रमांक लागतो. भारताचा मिलिट्री खर्चाचं बजेट अनेक  विकसित देशांपेक्षा जास्त आहे.  


जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक -  यामध्ये भारत  37व्या क्रमांकावर आहे.  2022 मध्ये आशियातील इतर अर्थव्यवस्थेच्या तुलनेत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताची होती. ज्यामध्ये भारत 43व्या क्रमांकावरुन 37व्या क्रमांकावर पोहचलाय. भारतामधील आर्थिक परिस्थितीही सुधारली आहे.  


जागतिक भूक निर्देशांक- कृषिप्रधान भारत उपासमारीच्या संकटात असल्याचे वास्तव नुकत्याच जाहीर झालेल्या ‘जागतिक भूक निर्देशांक अहवालातून समोर आले. या अहवालानुसार, उपासमार तसेच कुपोषणाबाबत भारताची परिस्थिती गंभीर आहे. जगातील 116 विकसनशील देशांच्या यादीत, भारत 101 व्या स्थानावर आहे. उपासमारीचं गंभीर संकट असलेल्या 31 देशांमध्येही भारत शेवटच्या 15 देशांमध्ये आहे. भारतासाठी हा एक चिंतेचा विषय आहे. उपासमारी कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत. 


ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स - यामध्ये भारत 46 व्या क्रमांकावर आहे.  या निर्देशांकामध्ये खूप कमी देशांना सामाविष्ट केलेय. त्यामध्ये भारत एक आहे.  


माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक - प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. त्यामुळे त्याचे स्वातंत्र्य महत्त्वाचे ठरते. मात्र याबाबत भारतातील स्थिती फार आशादायी नाही. असंख्य प्रसारमाध्यमगृहांची अवस्था चिंताजनक आहे. यात भारताची घसरण वारंवार होत आहे. यामध्ये भारत सध्या  150 व्या क्रमांकावर आहे. 


 भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांक - यामध्ये भारत 85 व्या क्रमांकावर आहे. 180 देशांमध्ये भारताचा 85 वा क्रमांक आहे. यावरुन भारतातील भ्रष्टाचाराची स्थिती समजते. भारतामध्ये भ्रष्टाचारबाबात व्यापक स्तरावर गंभीर पावले उचलण्याची गरज आहे.  


जागतिक हवामान जोखीम निर्देशांक - यामध्ये भारत सातव्या क्रमांकावर आहे. हा निर्देशांक हवामान बदलामुळे प्रभावित होणाऱ्या जगाभरातील देशांचा आहे. ज्यामध्ये भारताची स्थितीही चिंताजनक आहे.


जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक - यामध्ये भारत  71व्या क्रमांकावर आहे. यामध्ये भारताला खूप सुधारण्याची गरज आहे. केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.