इंदूर : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रविण कक्कड यांच्यासह दोन जणांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत आतापर्यंत जवळपास 9 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास दिल्ली आणि मध्य प्रदेशच्या भोपाळ आणि इंदूरसह सहा ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या.

कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रविण कक्कड यांच्या विजयनगरमधील घरावर आयकर विभागाने धाड टाकली. याशिवाय कमलनाथ यांच्या जवळचे मानले जाणारे राजेंद्र कुमार यांच्या मिगलानी येथील घरावर आयकर विभागाने धाड टाकली.


आयकर विभागाचे 15 हून अधिक अधिकारी या धाडसत्रात सहभागी झाले आहेत. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा आयकर विभागासोबत आहे.

आयकर विभागाला माहिती मिळाली होती की, लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हवालाच्या मार्गे पैशाची मोठी उलाढाल होणार आहे. याच माहितीच्या आधारावर आयकर विभागाने ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या धाडसत्रात जवळपास 9 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे आणि हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.