नवी दिल्ली : सध्या काही लोक देशातील नागरिकांना देशभक्तीची नवी व्याख्या शिकवू पाहत आहेत. देशाच्या विविधतेला नाकारणाऱ्या लोकांना हल्ली देशभक्त संबोधले जात आहे. असा आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. आज नवी दिल्लीत पार पडलेल्या विरोधकांच्या एका सभेत सोनिया गांधी बोलत होत्या.


सोनिया गांधी म्हणाल्या की, काही लोकांना देशात फार पूर्वीपासून असलेली विविधता स्वीकारार्ह नाही. विविधतेल्या नाकारणारे हे लोक देशवासियांना देशभक्तीची नवी व्याख्या शिकवू पाहत आहेत.

सोनिया गांधी म्हणाल्या की, ज्या संस्थांना आमच्या काँग्रेस सरकारने प्रगतिपथावर आणून मजबूत केले होते, त्या सर्व संस्थांना मोदी सरकारने संपण्याचे काम आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर या सर्व संस्थांना आणि प्रामुख्याने देशाच्या संविधानाला पुन्हा गतवैभव मिळवून देऊ.

सोनिया म्हणाल्या की, देशात गोमांसाच्या मुद्दा घेऊन हिंसाचार घडवला जात आहे. आम्ही काय खायचे, काय प्यायचे? कोणते कपडे परिधान करायचे? हे ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते आहे. या लोकांची आपण मनमानी का सहन करायची? असा सवाल सोनिया यांनी उपस्थित केला. संपूर्ण भाषणात सोनिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

गेल्या पाच वर्षात तुम्ही काय कामं केलीत? याबाबत बोला, असे अव्हानही सोनिया यांनी पंतप्रधान मोदींना केले आहे. सोनिया म्हणाल्या की, ते नेहमी सांगतात नेहरूंनी हे केलं, इंदिरांनी ते केलं, पण मोदीजींनी गेल्या पाच वर्षात स्वतः काय केलं? हेदेखील सांगावं.