नवी दिल्ली : गरीबांच्या जनधन खात्यात पैसे टाकून काळ्याचे पांढरे करण्याचा मार्ग काही लोकांनी शोधला असला तरी आयकर विभागाने आता त्याविरोधात मोहीम उघडलीय. आयकर विभागाने केलेल्या तपासात तब्बल 1.64 कोटी रूपयांच्या बेहिशेबी रक्कमेचा छडा लागला आहे.

नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमधून जनधन खात्यामध्ये सर्वाधिक बेहिशेबी रकमा जमा झाल्या होत्या. एरवी शून्य शिल्लक असलेल्या या खात्यांमध्ये कोट्यवधींच्या रकमा झाल्या होत्या.

पश्चिम बंगालमधील कोलकाता, मिदनापूर केरळमधील कोची आणि उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये उघडण्यात आलेल्या जनधन खात्यांमध्ये तब्बल 1.64 कोटी रूपयांची रोकड जमा करण्यात आली होती. तर बिहारमधील आरामध्ये एका जनधन खात्यात तब्बल 40 लाख रूपये जमा करण्यात आले होते.

आपलं उत्पन्न करपात्र नसल्यामुळे जे लोक कधीच इनकम टॅक्स रिटर्न फाईल करत नाहीत, अशाच व्यक्तींच्या जनधन खात्यातून या रकमा जमा करण्यात आल्या आहेत.

सीबीडीटी म्हणजे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सर्वसामान्य जनधन खातेधारकांना आपल्या खात्याचा दुरूपयोग न करण्याचं तसंच काळे पैसे साठवलेल्यांना जनधन खात्याचा गैरवापर करण्याची मुभा देऊ नका, असं आवाहन केलंय.

अलीकडेच उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन खातेधारकांना त्यांच्या खात्यात काही श्रीमंताकडून जमा केलेले पैसे काढू नका, असं आवाहन केलं होतं. हे सर्व पैसे आता गरीब जनधन खातेधारकाचेच होतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.

तुमच्या खात्यात हे पैसे कुणी जमा केले, याचा छडा आयकर विभाग लावणार असल्याचंही त्यांनी प्रचार सभेत सांगितलं होतं. जे धनदांडगे त्यांची बेहिशेबी संपत्ती लपवण्यासाठी किंवा पांढरी करून घेण्यासाठी या जनधन खात्याचा वापर करत आहेत, त्यांना गजाआड करणार असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं होतं.

देशभरात सध्या 25 कोटींपेक्षा जास्त जनधन बँक खाती

देशभरातील 25.78 कोटी जनधन खात्यांपैकी तब्बल 19.88 कोटी जनधन खाती ही कार्यरत असून 5.9 कोटी खाती आजही शून्य शिलक्कीची आहेत. म्हणजे या खात्यांमध्ये कसलाही व्यवहार झालेला नाही.

9 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर अनेकांनी आपला काळा पैसा या जनधन खात्यात जमा केला. नऊ नोव्हेंबरनंतर सर्वाधिक वेगाने जनधन खात्यात पैसे जमा होण्यात पश्चिम बंगालचा पहिला क्रमांक आहे.