मुंबई : मुंबई आणि गोव्याला जोडणाऱ्या सुपरफास्ट, हायटेक तेजस एक्स्प्रेसवर प्रवाशांनीच डल्ला मारला आहे. प्रवाशांनी चक्क हेडफोन्स चोरुन नेल्याचा प्रकार पहिल्याच फेरीनंतर समोर आला आहे. त्यामुळे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही चक्रावून गेले आहेत.


तेजस एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी प्रवासात वापरण्यासाठी दिलेले हेडफोन्स परत करण्याचीही तसदी घेतली नाही. त्याचप्रमाणे दोन एलईडी स्क्रीन्सचंही नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. बुधवारच्या प्रवासात अनेक प्रवाशांनी हेडफोन्स न मिळाल्याची तक्रार केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

सोमवारी झालेल्या पहिल्या फेरीतच इतकं चौर्यकर्म होत असेल, तर यापुढे किती जण 'हात साफ' करतील, असा प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांना पडला आहे. मुंबई-गोवा हे 552 किमीचं अंतर आठ ते नऊ तासात पार करणारी तेजस एक्स्प्रेस जमिनीवरील 'विमान प्रवास' अशी ऐट मिरवणार आहे. मात्र त्यापूर्वीच तिला चोरट्यांचं ग्रहण लागलं आहे.

सीट्सला जोडलेले एलईडी स्क्रीन्स, वायफाय, सीसीटीव्ही कॅमेरा, टी-कॉफी व्हेंडिंग मशिन अशा अनेक सोयीसुविधा तेजसमध्ये आहेत. ट्रेनमधील किमान डझनभर हेडफोन्स गायब झाले आहेत. हेडफोन परत करण्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. ज्याप्रमाणे ट्रेनमधील उशा-चादरी कोणी घरी नेत नाही, तसं हे हेडफोन्स प्रवासी ते परत करतील, अशी किमान अपेक्षा होती, असं एका रेल्वे अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

एका हेडफोनची किंमत रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेली नसली, तरी ते फारसे महाग नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र रेल्वेच्या झालेल्या नुकसानापेक्षा प्रवाशांची मानसिकता चक्रावून टाकणारी आहे, असं अधिकाऱ्यांना वाटतं. 992 सीट्स असलेल्या तेजसचं सर्वात स्वस्त तिकीट एक हजार 185 रुपये (चेअर कार, फूड शिवाय) आहे. तर एक्झिक्युटिव्ह क्लासचं सर्वात महाग तिकीट 2 हजार 740 रुपये आहे.

अत्याधुनिक सेवेनं सज्ज असलेल्या तेजस एक्स्प्रेसनं परतीच्या प्रवासातही प्रवाशांची घोर निराशा केली होती. मुंबई सीएसटीहून गोव्याकडे करमालीला थाटामाटात गेलेली तेजस एक्सप्रेस येताना मात्र दृष्ट लागल्यासारखी आली. परतीच्या प्रवासात ट्रेनमध्ये अस्वच्छता, दुर्गंधी आणि अपुऱ्या सोयींमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जेव्हा तेजस करमाळी स्थानकावरून निघाली,  तेव्हा ट्रेनमध्ये स्वच्छता नव्हती. तसंच ट्रेनमधील टॉयलेट्स साफ न केल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली असं प्रवाशांचं म्हणणं आहे. दुसरीकडे एका कुटुंबाला स्वयंचलित दरवाज्यांमुळे त्रास सहन करावा लागला. त्यापूर्वी समाजकंटकांनी तेजसच्या काचेवर दगडफेक केल्याचंही समोर आलं होतं.

संबंधित बातम्या


परतीच्या प्रवासात तेजस एक्स्प्रेसमध्ये घाणीचं साम्राज्य


अवघ्या आठ तासात तेजस करमाळीत दाखल


हायटेक तेजसच्या प्रवासासाठी 780 ते 2740 रुपये तिकीट


केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा... हायटेक ‘तेजस’ सज्ज!


'तेजस'वर समाजकंटकांची वक्रदृष्टी, काचा फोडल्या


मुंबई-गोवा 8.30 तासात, तेजस एक्स्प्रेस 22 मेपासून ट्रॅकवर!