मुंबई : जर तुम्ही इन्स्टाग्रामवर लक्झरी गाडीचे फोटो शेअर केले, किंवा फेसबुकवर महागड्या वस्तूंचे फोटो अपलोड केले तर आयकर विभागाचे अधिकारी तुमच्या दारात हजर झालेच म्हणून समजा. काळा पैसा शोधण्यासाठी आता आयकर विभागाची सोशल नेटवर्किंग साईटवर करडी नजर असणार आहे.


आयकर विभाग पुढील महिन्यापासून ‘प्रोजेक्ट इनसाईट’ सुरु करणार आहे. यामध्ये आयकर विभाग संबंधित व्यक्तीची सर्व माहिती आणि सोशल नेटवर्किंग साईटवरील माहिती पडताळणार आहे. त्याद्वारे संबंधित व्यक्तीचा खर्च आणि घोषित उत्पन्नामधील फरक तपासून पाहिला जाईल.

करचोरी रोखण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आयकर विभागाने हे पाऊल उचलंल आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयकर आणि संपत्तीच्या माहितीसाठी 8 क्रमांकाच्या पानावर आयकर विभागाने पॅन कार्ड आधारशी जोडणं अनिवार्य केलं आहे.

आयकर विभागाने मागील वर्षी 'प्रोजेक्ट इनसाईट' च्या अंमलबजावणीसाठी एलअँडटी इन्फोटेकसोबत (L&T) करार केला होता. सध्या बीटा परीक्षण सुरु आहे. पुढील महिन्यात त्याची सुरुवात होईल. याद्वारे आयकर विभागाला मोठ्या व्यवहारांची माहिती मिळेल आणि काळ्या पैशांवर अंकुश ठेवण्यास मदत होईल.