नवी दिल्ली : आयकर चुकल्याच्या आरोपावरून आयकर विभागाने दैनिक भास्करच्या विविध कार्यालयांवर छापे टाकले आहेत. रात्री अडीच वाजल्यापासून कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकले असल्याची माहिती मिळात आहे. भास्करच्या नोएडा, जयपूर आणि अहमदाबाद कार्यालयात आयकर इन्वेस्टिगेशन विंगकडून छापे टाकण्यात आले.


दैनिक भास्कर वृत्तपत्राच्या आवारात आयकर विभागाच्या छाप्यांसंदर्भात सरकारने सांगितले की, एजन्सी आपले काम करते आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, आयकर विभागाच्या छापेमारीवर काही बोलू शकत नाही. सरकारचा यात हस्तक्षेप नाही. संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच या विषयावर काही वक्तव्य केलं पाहिजे.






कर्मचाऱ्यांचे फोनही जप्त केले


आयकर विभागाची ही मोठी छापेमारी मानली जात आहे. भास्करच्या कार्यालयात उपस्थित सर्व कर्मचार्‍यांचे फोन जप्त केले, अशीही माहिती आहे. तसेच कोणालाही बाहेर जाऊ दिले जात नाही. प्रेस कॉम्प्लेक्ससह अनेक ठिकाणी आयकर विभागाची टीम उपस्थित आहे.


कर चुकवल्याच्या आरोपाखाली आयकर विभागाने गुरुवारी विविध शहरांमध्ये असलेल्या दैनिक भास्करच्या माध्यम समूहावर छापे टाकले. भोपाळ, जयपूर, अहमदाबाद आणि इतर काही ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यांवरून विरोधक सरकारविरोधात एकत्र आले आहेत. आधी या विषयावर राज्यसभेत गदारोळ झाला आणि नंतर ट्विटरच्या माध्यामातून मोदी सरकारवर निशाणा साधला गेला.






छापेमारीवर काँग्रेसची टीका


या छापेमारीवरुन काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट केले की, रेड जीवी जी, पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर भ्याड हल्ला! दैनिक भास्करच्या भोपाळ, जयपूर आणि अहमदाबाद कार्यालयांवर आयकर छापा. लोकशाहीचा आवाज "रेडराज"ने दडपू शकणार नाही.