नवी दिल्ली : या देशात निवडणुकीच्या नावाखाली बदमाशी सुरु असून भाजपचा महाराष्ट्राप्रमाणेच मतदारयादीतून नावे कमी करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. मतदारयाद्यांमधील घोळावरून केजरीवाल यांनी गंभीर आरोप केले असून दिवसाला तीनशे ते चारशे नावे कमी होत असल्याचा आरोप केला आहे. स्वत:च्या मतदारसंघात 15 दिवसात 10 हजार मतदार वाढल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. इतक्या दिवसात असे मतदार कसे काय वाढले? असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला.
बोगस मतदान करण्याची भाजपची योजना
केजरीवाल म्हणाले की, या निवडणुकीत बनावट मतदान करण्याची भाजपची योजना आहे. गेल्या 15 दिवसांत नवी दिल्ली विधानसभेत अचानक 10 हजार मतदारांची वाढ झाली आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने अद्याप एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. दिल्ली भाजपने एक दिवस आधी (28 डिसेंबर) मतदारांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोपही आपवर केला होता. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदारांचा डेटा शेअर करताना लाखो अल्पसंख्याक मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट केल्याचा दावा केला आहे.
केजरीवालांचे चार आरोप...
- गेल्या 15 दिवसांत त्यांनी नवी दिल्ली विधानसभेतील पाच हजार मतदारांची नावे हटवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी 7500 मतदारांची नावे (आता वाढवून 10 हजार) जोडण्यासाठी अर्जही दिले आहेत.
- माझ्या विधानसभेत एकूण एक लाख सहा हजार मतदार आहेत. यापैकी 5 टक्के मतदारांची नावे हटवली जात आहेत. 7.5 टक्के मतदारांची नावे जोडली जात आहेत. अशा परिस्थितीत आता निवडणुका कशासाठी घेतल्या जात आहेत?
- निवडणुकांच्या नावाखाली या देशात खेळ केला जात आहे. 12 टक्के मते इकडून तिकडे वळवली तर काय उरणार? आकडेवारीत तफावत आढळल्यास निवडणूक आयोगावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते.
- केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑक्टोबर ते 15 डिसेंबरपर्यंत मतदारांची संख्या 2776 ने वाढली आहे. तर 25 डिसेंबरपर्यंत मतदारांची संख्या 7876 ने वाढली आहे.
भाजपचे तीन आरोप...
- केजरीवाल यांना फसवणूक करून निवडणूक जिंकायची आहे. यासाठी आप सरकार बनावट योजना आणत आहे आणि बनावट आधार कार्ड वापरणाऱ्या लोकांसाठी बनावट मतदार ओळखपत्र बनवत आहे.
- 2015 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केवळ 8 महिन्यांत दिल्लीतील मतदारांची संख्या 14 लाखांनी वाढली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत 1.19 कोटी मतदार होते, जे 2015 च्या विधानसभा निवडणुकीत 1.33 कोटी झाले.
- त्याच वेळी, 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी चार वर्षांत केवळ 6 लाख मतदार यादीत समाविष्ट केले गेले होते, परंतु 2020 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत 8 महिन्यांत 9 लाख मतदार मतदार यादीत जोडले गेले. त्यामुळे मतदारांची संख्या 1.42 कोटी झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या