राजकोट : गर्भवतीला प्रसुतीसाठी रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेला सिंहांच्या कळपाने गराडा घातला. गुजरातमधील जाफराबाद तालुक्यातील लुंसापूर गावात ही घटना घडली. त्यामुळे सिंहांनी घेरलेल्या अॅम्ब्युलन्समध्येच महिलेची डिलीव्हरी झाली.
महिलेला प्रसुतीवेदना सुरु झाल्यावर तिच्या कुटुंबियांनी 108 क्रमांकावर फोन करुन अॅम्ब्युलन्स बोलवली. महिलेला प्रसुतासाठी नेत असताना गावापासून 3 किमी अंतरावर अचानक रस्त्यावर सिंहांचा कळप आला.
या कळपात जवळपास 12 सिंह होते. त्यांना रस्त्यावरुन हटवण्याचा प्रयत्न चालकाने केला. मात्र ते काही केल्या रस्त्यावरुन बाजूला व्हायला तयार नव्हते.
महिलेला प्रसुती वेदनेसह रक्तस्राव व्हायला सुरुवात झाली होती. त्यावेळी अॅम्ब्युलन्समधील कर्मचाऱ्यांनी
तिथेच प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांशी फोनवरुन संपर्क करुन डॉक्टरांकडून मार्गदर्शनखाली 25 मिनिटांमध्ये त्या महिलेची प्रसुती केली.
विशेष म्हणजे तोपर्यंत हे सिंह रुग्णवाहिकेच्या भोवती फिरत होते. मात्र बाळाच्या जन्मानंतर हळूहळू सिंह बाजुला गेले आणि रुग्णवाहिका पुढे नेऊन बाळ-बाळंतीणीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. महिला आणि बाळाची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आहे.