दिल्लीत ICIA म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी उपस्थिती लावली. यावेळी सीएचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्थेसाठी योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
''स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा 45 टक्क्यांनी कमी''
सरकारने सत्तेत आल्यापासून सुरु केलेल्या काळ्या पैशांविरोधातील मोहिमेचं यश स्विस बँकेच्या ताज्या आकडेवारीतून दिसतं. स्विस बँकेतला भारतीयांचा पैसा आता 45 टक्क्यांनी कमी झाला आहे. 2013 मध्ये याउलट भारतीयांच्या पैशात 42 टक्क्यांनी वाढ झाली होती, अशी माहिती मोदींनी दिली.
''नोटाबंदीनंतर 1 लाख कंपन्यांना टाळं''
नोटाबंदीनंतर संशयास्पद देवाणघेवाण करणाऱ्या 3 लाखांपेक्षा अधिक कंपन्या चौकशीच्या घेऱ्यात आहेत. तर 1 लाख कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. कायद्याची पायमल्ली करणाऱ्या कंपन्यांवर येत्या काळात आणखी कठोर कारवाई केली जाईल. एक राजकीय नेता म्हणून कंपन्यांवरील कारवाईचा राजकारणात तोटा आहेच, पण कुणीतरी सुरुवात करणं गरजेचं आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
नोटाबंदीनंतर बँकांमध्ये जमा झालेल्या पैशाची माहिती संकलित करण्यासाठी मोठी यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. आतापर्यंतच्या माहितीच्या आधारावर 3 लाख कंपन्या रडारवर आहेत. येत्या काळातही अनेक कंपन्या चौकशीच्या घेऱ्यात सापडू शकतात. पैसा कुठून आला, कसा आला, याची सखोल चौकशी केली जात असल्याचं मोदींनी सांगितलं.
''देशात केवळ 32 लाख जणांचंच उत्पन्न 10 लाखांपेक्षा अधिक?''
देशात 2 लाख 72 हजारांपेक्षा जास्त सीए आहेत आणि सहाय्यकांचा आकडा आणि सर्व सीए मिळून हा आकडा 8 लाखांपर्यंत जातो. देशात 2 कोटींपेक्षा जास्त इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट ग्रॅज्युएट्स आहेत. देशातील विविध शहरातील आलिशान घरांची संख्या कोटींमध्ये आहे. गेल्या वर्षात परदेशात फिरण्यासाठी 2 कोटी 18 लाख जण गेले. मात्र देशाचं कटू सत्य हे आहे, की फक्त 32 लाख लोकंच मान्य करतात, की त्यांचं उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे. यावर कुणालाही विश्वास बसेल का, असा सवाल पंतप्रधान मोदींनी विचारला.
सीएने ठरवलं तर कुणीही करचुकवेगिरी करु शकणार नाही. तुमच्या ग्राहकांना प्रामाणिकपणा शिकवा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.
''गेल्या 11 वर्षात फक्त 25 सीएवर कारवाई'
संसदेने सीएंना एवढे अधिकार दिले आहेत. गेल्या 11 वर्षात फक्त 25 सीएंवरच कारवाई झाली आहे. खरोखर गेल्या 11 वर्षांमध्ये 25 जणांनी आर्थिक घोटाळे केले का, असा सवालही मोदींनी विचारला.
सीएच्या सहीमध्ये एका पंतप्रधानच्या सहीपेक्षाही जास्त ताकद आहे. सीएमच्या सहीवर विश्वास ठेवून सर्व सामान्य व्यक्ती गुंतवणूक करतो. हा विश्वास कधीही तुटू देऊ नका, असं आवाहनही मोदींनी केली.
मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
- तुम्ही (CA) ठरवलं तर करचुकवेगिरी कुणीही करु शकणार नाही : पंतप्रधान मोदी
- तुमच्या एका सहीमध्ये पंतप्रधानाच्या सहीपेक्षा जास्त ताकद : पंतप्रधान मोदी
- काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी तुमच्या (CA) ग्राहकांना प्रामाणिकपणा शिकवा : पंतप्रधान मोदी
- स्वातंत्र्यानंतरच्या देशाच्या एकीकरणानंतर आता देशाचं आर्थिक एकीकरण होत आहे : पंतप्रधान मोदी
- गेल्या 11 वर्षात केवळ 25 CA वरच कारवाई, फक्त 25 जणांनीच घोटाळे केले का? : पंतप्रधान मोदी
- 10 लाखांपेक्षा जास्त कमाई असल्याचं केवळ देशातील 32 लाख लोक मान्य करतात : पंतप्रधान मोदी
- नोटाबंदीच्या काळात संशयास्पद व्यवहार करणाऱ्या कंपन्यांना कुणीतरी मदत केलीच असेल : पंतप्रधान मोदी
- कंपन्यांवरील कारवाईचा राजकारणात तोटा, पण कुणापासून तरी सुरुवात होणं गरजेचं : पंतप्रधान मोदी
- नियम मोडणाऱ्या कंपन्यांवर येत्या काळात आणखी कठोर कारवाई : पंतप्रधान मोदी
- नोटाबंदीनंतर एक लाखांपेक्षा जास्त कंपन्यांना टाळं ठोकलं : पंतप्रधान मोदी
- नोटाबंदीनंतर 3 लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत कंपन्यांची देवाणघेवाण चौकशीच्या घेऱ्यात : पंतप्रधान मोदी
- नोटाबंदीनंतर बँकेत जमा झालेल्या पैशांची मोजणी चालू, पैसा कुठून, कसा आला, त्याचा शोध सुरु : पंतप्रधान मोदी
- नोटाबंदीनंतर तुमचं (CA) काम मोठ्या प्रमाणात वाढल्याचं ऐकलं
- एकीकडे स्वच्छ भारत अभियान, तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेत सफाई अभियानही चालू : पंतप्रधान मोदी
- 2013 मध्ये स्विस बँकेत भारतीयांचा पैसा 42 टक्क्यांनी वाढला, आता तो 45 टक्क्यांनी कमी झालाय : पंतप्रधान मोदी
- स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा 45 टक्क्यांनी कमी झाला : पंतप्रधान मोदी
- काळ्या पैशांविरोधातील मोहिमेचं यश स्विस बँकेच्या ताज्या आकडेवारीतून दिसतं : पंतप्रधान मोदी
- देश कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो, पण कुणाला चोरी करण्याची सवय असेल, तर विकास ठप्प होतो : पंतप्रधान मोदी
- जगभरात भारतातील चार्टर्ड अकाऊंटंट्स त्यांच्या कौशल्यासाठी ओळखले जातात : पंतप्रधान मोदी
- चार्टर्ड अकाऊंटंट्सवर अर्थव्यवस्थेच्या स्वास्थ्याची जबाबदारी : पंतप्रधान मोदी