मुंबई: अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी 2017-18 साठीचा अर्थसंकल्प संसदेत मांडला. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे आणि सर्वसामान्य अर्थसंकल्प एकत्रित मांडला जाणार असल्याने, रेल्वे प्रवासी आणि विशेष करुन मुबंईकर रेल्वे प्रवाशांना काय मिळणार? याकडे सर्व मुंबईकरांचे लक्ष्य होते. त्यानुसार अर्थमंत्र्यांनी कोणती मोठी घोषणा केली नसली, तर 636 कोटी रुपये खर्चून मुंबईतील ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनन्स( LTT) मुंबई सेंट्रल, बोरिवली आणि वांद्रे टर्मिनन्स यांची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. तसेच प्रवाशांच्या सोईसाठी ८३ कोटी खर्च केले जाणार आहेत.


दोन नव्या कॉरि़डॉरसाठी भरीव तरतूद

याशिवाय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 2016-17 मधील अर्थसंकल्पात घोषित केलेल्या दोन नव्या रेल्वे प्रकल्पांचे काम लवकरच सुरु व्हावे, यासाठी ठोस तरतूद करण्यात आली आहे. यात विरार- वसई- पनवेल या 72 किमीच्या नवीन कॉरिडॉर, हर्बर मार्गावरील प्रवाशांसाठी 55 किमीचा जलद कॉरिडॉर सीएसटी ते पनवेल (एक स्पेशल ब्रांच नवी मुंबई एयरपोर्टला जाणार) उभारला जाणार आहे.

या दोन्ही नव्या कॉरिडॉरपैकी विरार-दीवा-पनवेल प्रकल्पामुळे पश्चिम, मध्य आणि हर्बर रेल्वे मार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत. तर सीएसटी-पनवेल या एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे हर्बर मार्गावरही जलद लोकल ट्रेन धावणार आहेत.

पीपीटी मॉडेलने उभारणी

हे दोन्ही प्रकल्प पीपीटी  मॉडेलद्वारे उभारण्याचे रेल्वे मंत्रालयाने निश्चित केले आहे. तसेच यासाठी सरकारकडून प्रत्येक प्रकल्पासाठी 10 लाख रुपये मंजूर केले आहेत. यातील वसई-दीवा-पनवेल हा प्रकल्प सर्वात मोठी असून, सीएसटी ते पनवेल या एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यासाठी रेल्वेच्या अभियंत्यांचा कस लागणार आहे.

MUTP अंतर्गत सर्व खर्च

हा सर्व खर्च मुंबई अर्बन ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून खर्च केला जाणार आहे. यातील MUTP-2 वर 137 कोटी, तर MUTP -3 साठी 411.50 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय बेलापूर-सीवुड- उरणसाठी 66 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

MUTP-2 च्या प्रकल्पाचा एकूण खर्च 7300 कोटी रुपये असून, या प्रकल्पाच्या उभारणीतून हर्बर मार्गावर 70 रेल्वे सुरु होतील. तसेच गेल्या काही वर्षात हर्बरवरील डीसी केबलचे एसी केबलमध्ये परिवर्तन केल्यामुळे हर्बर मार्गावरुन 12 डब्यांची लोकल धावत आहेत. MUTP-3 मध्ये अजून दोन प्रकल्पांचा समावेश असल्याने यातून विरार-डहाणू (63 किमी) आणि एरोली ते कळवा (४ किमी) चे नवे रेल्वे मार्ग सुरु होणार आहेत. पश्चिम आणि ट्रान्स हर्बरवरील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. तसेच पनवेल ते कर्जत या मार्गाचेही लवकरच दुपदरीकरण करण्यात येणार आहे.

रेल्वे अपघातील मृतांची संख्या कमी करण्यासाठी ठोस उपाय योजना

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईकर प्रवाशांना रुळ आपला जीव गमवावा लागल्याने 2020 पर्यंत रेल्वे रुळ ओलांडून अपघात होऊ नये, यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी घोषित केले. गेल्या वर्षी म्हणजे लोकल प्रवासावेळी 2016 मध्ये 3206 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

2017-18 मधील मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्प 

  • सावंतवाडी ते रेडी किल्ला २० किमी - रुपये पाच लाख 

  • राहुरी ते शनिशिंगणापूर २५ किमी - रुपये चार लाख

  • बिदर ते नांदेड १५७ किमी - रुपये 24 लाख

  • कारखेली ते नरसी ३० किमी - रुपये 8 लाख

  • रोटेगाव ते कोपरगाव २२ किमी - रुपये सहा लाख

  • वारुड ते आर्वी (पुलगाव) ६० किमी - रुपये 15 लाख


नवीन मार्ग

  • जेऊर ते आष्टी - ७८ किमी, रुपये 1560 कोटी

  • फलटण ते पंढरपूर - १०५ किमी, रुपये 1149 कोटी

  • हातकलांगाने ते इचलकरंजी - ८ किमी, रुपये 160 कोटी

  • पुणे ते लोणावळा - तिसरी मार्गिका, ६३.८४ किमी, रुपये 4253 कोटी

  • विरार- वसई- पनवेल नवीन कॉरिडॉर - ७२ किमी, रुपये 8787 कोटी

  • फास्ट कॉरिडॉर सीएसटी ते पनवेल (एक स्पेशल ब्रांच नवी मुंबई एयरपोर्टला जाणार) - ५५ किमी, रुपये 12131  कोटी


 

विद्युतीकरण 

  • दौंड - बारामती, ४४ आरकेएम, रुपये 47.33 कोटी

  • वाणी ते पिंपळखुटी, ६६ आरकेएम, रुपये 77.08  कोटी

  • मिरज कुर्डुवाडी लातूर, ३७७ आरकेएम, रुपये 399.27 कोटी

  • गडोग ते होटगी, २८४ आरकेएम, रुपये 341.72 कोटी


 

प्रवाश्यांसाठी सोयी

  • 2016-17:  रुपये 50 कोटी

  • 2017-18 : रुपये 83 कोटी