नवी दिल्ली: भविष्यात सर्जिकल स्ट्राईक होणारच नाहीत, याची शाश्वती देता येत नाही, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. सीएनएन न्यूज-18 आणि न्यूज 18 इंडिया या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह यांनी पुन्हा पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत.
राजनाथ सिंह म्हणाले की, ''पाकिस्तान आपला शेजारील देश आहे. त्यांनी स्वत:च्या वर्तणुकीत बदल करणे, त्याच्यांसाठी योग्य असेल. पण जर पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांनी भारतावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास, भारत शांत बसणार नाही. तशी परिस्थिती निर्माण झाल्यास, आमच्याकडून सर्जिकल स्ट्राईक होणारच नाहीत याची शाश्वती देता येणार नाहीत.''
सर्जिकल स्ट्राईकनंतर पहिल्यांदाच मुलाखत देताना राजनाथ सिंह म्हणाले की, ''मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला नजरकैद करणे म्हणजे, पाकिस्तानची नुसती डोळ्यात धुळफेक आहे. पाकिस्तानला जर खरच दहशतवाद्यांविरोधात लढायचं असेल, तर त्यांनी पहिल्यांदा हाफिज सईदवर कठोर कारवाई करुन त्याची रवानगी तरुंगात करालया पाहिजे.''
हाफिज सईदसंदर्भात चीनच्या भूमिकेवरही राजनाथ सिंह यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ''चीन याप्रकरणी आमचे समर्थन करणार नाही, याची पूर्ण कल्पना होती. कारण तो त्यांच्या धोरणांचा अंतर्गत विषय आहे. पण एक दिवस ते देखील यासाठी भारताला सहकार्य करतील अशी आशा आहे.''
यावेळी त्यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लीमबहुल सात देशावर घातलेल्या बंदीवर प्रतिक्रिया देणे टाळले. पण ट्रम्प यांनी हा महत्त्वाचा निर्णय अंतर्गत दहशतवादाच्या परिस्थितीसाठी घेतला असेल, असे सांगितले.
संबंधित बातम्या
ट्रम्प-मोदींमुळे नजरकैद, हाफिज सईदची गरळ
26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद नजरकैदेत
मुस्लीमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेत नो एंट्री : ट्रम्प