Assam Flood Situation Update : संततधार मुसळधार पावसामुळं आसाममध्ये पूर आला आहे. पुरामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील 40 लाखाहून अधिक लोक या पुरामुळं बाधित झाले आहेत. तर पूर आणि भूस्खलनामुळं आत्तापर्यंत 134 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. कालदिया नदीला आलेल्या पुरामुळे सध्याची परिस्थिती आणि नुकसानीची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बजली जिल्ह्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी भबानीपूर, बजली येथील चारलपारा नयापारा येथील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. आसाममधील 74 हजार 655 हेक्टरवरील पीक क्षेत्र अजूनही पाण्याखाली आहे. 


पूरग्रस्त भागात मदतकार्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे आत्तापर्यंत 134 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हळूहळू आसाममधील पुराची स्थिती सुधारत आहे. काही भागत अद्यापही पुराचे पाणी आहे. बहुतांश नद्यांची पाणीपातळी कमी होत आहे. मात्र, नागावमधील कोपिली, कछारमधील बराक आणि करीमगंजमधील करीमगंज आणि कुशियारा धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. 




मुख्यमंत्री सातत्याने आढावा घेत आहेत


विमानाच्या माध्यमातून सिलचर शहरातील पुराचा नकाशा तयार करण्यासाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण केले जात आहे. विविध भागातील नुकसानीचे मूल्यांकन करुन भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी ते कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यास मदत होऊ शकते. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मागच्या दोन दिवसांत दोन वेळा सिलचरला भेट देऊन शहरातील मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतल्याची माहिती कचारचे उपायुक्त कीर्ती जल्ली यांनी दिली.




 2 हजार 774 जनावरे पाण्यात वाहून गेली


आसाममध्ये पुराच्या पाण्यामुळं 79 रस्ते आणि पाच पुलांचं मोठं नुकसान झालं आहे. तर सहा बंधारे तुटले आहेत. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे 74 हजार 655 हेक्टरवरील पीक क्षेत्र अजूनही पाण्याखाली आहे. आतापर्यंत 2 हजार 774 जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. दरम्यान, बॉलीवूड अभिनेता आमिर खान यानं या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीला 25 लाख रुपयांची देणगी दिली.