IMD Weather Update : देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून, सगळीकडे वातावरण आल्हाददायक झालं आहे. या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीतही शनिवारी (काल) पावसानंतर वातावरणात बदल झाला असून येथेही आज पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 4 ते 5 दिवसांत उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, झारखंडसह इतर राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
याशिवाय देशाच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गेल्या 24 तासांबद्दल बोलायचे झाले तर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस सुरू आहे. याशिवाय मिझोराम, नागालँड आणि मणिपूरमध्येही चांगला पाऊस पडला आहे.
आज दिल्लीतील हवामान कसे असेल?
राजधानी दिल्लीत सध्या G20 शिखर परिषद सुरु आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री मुसळधार पावसाची नोंद झाली. एवढेच नाही तर, आज (रविवार) पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. IMD नुसार, रविवारी दिल्लीत हलक्या पावसासह ढगाळ वातावरण राहण्याची अपेक्षा आहे. हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, राजधानीत पुढील दोन दिवस रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता असून रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी सतत पाऊस पडणार आहे.
उत्तर प्रदेश-उत्तराखंडमध्ये हवामान कसे असेल?
यूपीमध्येही शनिवारी झालेल्या पावसामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 3 अंश सेल्सिअसपर्यंतची घसरण दिसून आली. यामुळे राज्यातील जनतेला उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने उत्तर प्रदेशातील बस्ती, गोंडा, श्रावस्ती, बहराइच, बाराबंकी, रायबरेली आणि इतर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
उत्तराखंडमध्येही पावसानंतर वातावरण आल्हाददायक आहे. डेहराडून, पिथौरागढ, बागेश्वर आणि नैनितालमध्ये विजांच्या कडकडाटांंसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, हवामान विभागाने पुढील 3 ते 4 दिवस महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडूच्या विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून उर्वरित देशात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मुसळधार पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेत भारतीय हवामान विभागाने नागरिकांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय जर, काही अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा अशा इशाराही उत्तराखंडमधील नागरिकांना देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घेणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :