Weather Today Updates: गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात सतत कडक ऊन पडतंय. राष्ट्रीय राजधानीसह देशातील अनेक राज्यांमध्ये सकाळपासून रात्री उष्ण वाऱ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणीही वाढत आहेत. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील अनेक भागांत तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. तसेच, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे.
'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी (16 मे) दिल्ली आणि आसपासच्या भागांत 40-50 किमी/तास वेगानं जोरदार वारे वाहतील. तसेच यानंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याशिवाय, मंगळवार, 16 मे रोजी दिल्लीत कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये कमाल तापमान 46 अंशांच्या आसपास पोहोचलं आहे. तसेच, 16 मे रोजी राज्यातील भरतपूर, बिकानेर दौसा जैसलमेर, नागौर, चुरू, सीकर, श्रीगंगानगर, हनुमानगढ जिल्हे आणि आसपासच्या भागांत वादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात उष्णतेची लाट
महाराष्ट्रातही वाढत्या उष्णतेमुळं नागरिक बेजार झाले आहेत. रखरखत्या उन्हामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. राज्यात कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. हवामान खात्यानं देशातील बहुतांश शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. याशिवाय राज्यातील अनेक भागांत पारा 45च्या पुढे जाऊ शकतो, असा इशाराही हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागा होरपळल्या
वाढत्या उष्णतेचा परिणाम शेतपिकांवरही होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी अवकाळी आणि गारपीट अन् आता वाढलेली उष्णता यांमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हिंगोलीत तर वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागा होरपळल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीच्या बागांची लागवड केली जाते. यावर्षी 1600 हेक्टरवर केळीच्या बागांची लागवड केली आहे. परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून अचानक तापमानात वाढ झाल्यानं याचा फटका केळीच्या भागांना बसतोय. हिंगोली जिल्ह्याचं तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचल्यामुळे या केळीच्या बागा होरपळून निघत आहेत. केळीची पानं या तापमानामुळे पिवळी पडत आहेत, तर काही पानं वाळली आहेत. केळीच्या झाडांमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानं अनेक केळीची झाडं उन्मळून पडली आहेत, तर तापमान वाढल्यानं केळीच्या फळांवर काळे डाग पडत आहेत. हे केळीचं पिक काहीच दिवसांमध्ये तोडणी करून विक्री केली जाणार होती. परंतु तापमान वाढल्याचा फटका या केळीच्या बागांना बसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.