Mamata Banerjee on 2024 Lok Sabha:  कर्नाटक विधानसभा निकालानंतर (Karnataka Election Results) आगामी लोकसभा निवडणुकांच्या चर्चांना जोर आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज महत्त्वाचे वक्तव्य केले. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला (Congress) नमतं घ्याव लागणार असल्याचे त्यांनी म्हटले. ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत, त्या ठिकाणी काँग्रेसने कमी जागा लढवाव्यात असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले. ममता यांनी काँग्रेसने 200 जागांवर निवडणूक लढवावी असे स्पष्टच म्हटले. 


ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, आम्ही केलेल्या विश्लेषणानुसार काँग्रेस 200 जागांवर मजबूत आहे. त्या जागांवर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मात्र, काँग्रेसला इतर राजकीय पक्षांनादेखील पाठिंबा द्यावा लागणार आहे. आम्ही कर्नाटकमध्ये काँग्रेसला पाठिंबा देणार असू तर त्यांनी आम्हाला पश्चिम बंगालमध्ये पाठिंबा द्यायला हवा, असे ममता यांनी म्हटले. काँग्रेसला काही हवं असेल तर त्यांनी काही गोष्टींचा त्याग करण्याची आवश्यकता आहे, असेही ममता यांनी म्हटले. 


ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर


मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, या महिन्याच्या अखेरीस त्या दिल्लीला जाणार आहेत. 27 मे रोजी होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला त्या उपस्थित राहतील. राज्याचे प्रश्न मांडण्यासाठी दुसरा पर्याय नाही. त्यामुळे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. आपल्या दिल्ली दौऱ्याच्या दरम्यान, विरोधकांच्या बैठकीबाबत काहीच ठरले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


छत्तीसगड-मध्य प्रदेशमध्ये भाजपचा पराभव होणार


ममता बॅनर्जी यांनी अहंकार, तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या भाजपच्या राजकारणाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन करत भाजपविरोधात मतदान न करण्याची मोहीम चालवावी असे त्यांनी म्हटले. आगामी काही महिन्यातच छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. त्यातही भाजपचा पराभव होणार असल्याचा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: