Indian Meteorological Department : आज (11 एप्रिल) भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर्षी देशात मान्सूनची (Monsoon) स्थिती काय रहाणार याबाबतची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात येणार आहे. भारतीय हवामान विभागाचा हा मान्सूनबाबतचा पहिला अंदाज असणार आहे. त्यामुळं यंदा देशातील पावसाच्या स्थितीबाबत भारतीय हवामान विभाग नेमकी काय माहिती देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद
आज दुपारी 12.30 वाजता भारतीय हवामान विभागाची पत्रकार परिषद होणार आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि आयएमडीचे महासंचालक डॉ. महापात्रा यांच्या उपस्थिती ही पत्रकार परिषद होणार असून, यामध्ये मान्सून संदर्भात माहिती दिली जाणार आहे. दरम्यान, स्कायमेट या खासगी हवामान संस्थेकडून मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये यावर्षी देशात सरासरीपेक्षा पाऊस कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर आज भारतीय हवामान विभागाकडून देखील जून ते सप्टेंबर दरम्यानचा सरासरी पाऊसमानाचा अंदाज जारी करण्यात येणार आहे.
मागील वर्षीचा पावसाचा अंदाज?
मागील वर्षी देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. 14 एप्रिल रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज वर्तवला होता. मागील वर्षी देशात देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असल्याचे सांगितले होते. तर स्कायमेट या खासगी संस्थेने देशभरात मान्सून (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या 98 टक्के राहण्याची शक्यता मागील वर्षी वर्तवली होती. दरम्यान, मागील वर्षी देशभरात चांगला पाऊस झाला होता. महाराष्ट्रातही पावसाची स्थिती चांगली राहिली होती. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली होती. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला होता.
अर्थव्यवस्थेवर मान्सूनचा परिणाम काय ?
खराब पावसामुळं पिकांचे नुकसान होते आणि त्यामुळं जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात. त्यामुळे सर्वसामान्यांची खर्च करण्याची क्षमता कमी होते आणि त्यानुसार बचत आणि गुंतवणूकही कमी होते. खराब मान्सूनमुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे आणि त्याचा परिणाम ग्राहकोपयोगी वस्तू, दुचाकी, ट्रॅक्टर आणि सोन्याच्या मागणीवर दिसून येत आहे. अशाप्रकारे, मान्सूनचा भारतीय अर्थव्यवस्थेशी थेट संबंध असल्याचे दिसून येते.
महत्त्वाच्या बातम्या: