IMA Wrote Letter To Pm Modi : नवी दिल्ली : कोलकात्यातील डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरातील वातावरण पुरतं चिघळलं. पीडितेला न्याय आमि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन देशभरातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. अशातच, आता इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) कोलकाता प्रकरणाबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा आणावा आणि रुग्णालयांना अनिवार्य सुरक्षा अधिकारांसह सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावं, अशी मागणी करणारं पत्र इंडियन मेडिकल असोसिएशननं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे. 


कोलकाता येथे महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त लोकांनी कोलकाता येथील आरजी कर हॉस्पिटलची तोडफोडही केली. सध्या या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ IMA नं शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात 24 तासांसाठी विना-आपत्कालीन सेवा बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे.


इंडियन मेडिकल असोसिएशनचं पत्र, पंतप्रधानांकडे कोणत्या मागण्या केल्या? 



  • कोलकात्यामधील घटनेचा उल्लेख करत डॉक्टरांविरोधात होणाऱ्या घटनेसंदर्भात गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करण्यात आली आहे. 

  • महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मतही इंडियन मेडिकल असोसिएशननं व्यक्त केलं आहे. 

  • डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय कायदा कठोर करत ठोस उपाययोजना करण्याची मागणीही या पत्रातून पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. 

  • रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्याची मागणी, ज्याचं सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकांची व्यवस्था चांगली असण्याची मागणी केली गेली आहे. 

  • डॉक्टरांची शिफ्ट 36 तासांपर्यंत होत असल्यानं महिला डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्सना रेस्ट रुम पुरवाव्यात, असंही पत्रात नमूद करण्यात आलंय. 

  • 60 टक्के महिला डॉक्टर्स आहेत, 68 टक्के डेंन्टल डॉक्टर्स, 75 टक्के फिजिओथेरपिस्ट आणि 85 टक्के नर्सिंगमध्ये असल्यानं आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार व्हावा, असंही पत्रात सांगण्यात आलंय.  


केंद्रीय कायद्याची मागणी


डॉक्टरांच्या संरक्षणासाठी केंद्रीय कायदा करण्याची मागणीही आयएमएनं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. IMA नं गुन्ह्याचा काळजीपूर्वक आणि सखोल तपास करावा. तसेच, बर्बरतेमध्ये सहभागी असलेल्यांची ओळख पटवून आणि गुंतलेल्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. "आरजी कर रुग्णालयातील घटनेनं रुग्णालयातील हिंसाचाराचे दोन आयाम समोर आणले आहेत: महिलांसाठी सुरक्षित जागा नसल्यामुळे गंभीर गुन्हा आणि संघटित सुरक्षा प्रोटोकॉलच्या अभावामुळे गुंडगिरी, गुन्हे आणि क्रूरपणामुळे राष्ट्राच्या विवेकाला धक्का बसला आहे.", असंही IMA नं पत्रात म्हटलं आहे.