कोलकाता :कोळसा माफियांशी आमच्या पक्षातील कोणाचाही संबंध असल्याचा आरोप तुम्ही सिद्ध करु शकला नाहीत, तर तुम्हाला जनतेसमोर कान पकडून 100 उठा-बशा काढाव्या लागतील, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे.

ममता म्हणाल्या की "पंतप्रधान मोदींनी तृणमूल काँग्रेसवर आरोप केला आहे की, आमच्या नेत्यांचे कोळसा माफियांशी सबंध आहेत. जर मोदी हे आरोप सिद्ध करु शकले तर लोकसभा निवडणुकीतून मी माझे 42 उमेदवार मागे घेईन."

ममता एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्या की, "जर मोदी त्यांनी केलेले आरोप सिद्ध करु शकले नाहीत तर त्यांना लोकांसमोर दोन्ही कान धरुन 100 उठा-बशा काढाव्या लागतील."

VIDEO | ममतादीदी विकासातल्या स्पीड ब्रेकर, पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी बांकुरा येथील एका प्रचारसभेत भाषणादरम्यान म्हणाले होते की, "पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कोळसा माफियांचे राज्य सुरु आहे. ज्या लोकांनी इथे काम करायला हवं, त्यांना त्यापासून वंचित ठेवले जात आहे. येथील परिस्थिती भीषण आहे."


ममता आणि मोदी यांचं शाब्दिक युद्ध गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मागील आठवड्यात फनी या चक्रिवादळाने ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडक दिली होती. या वादळासंदर्भात माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता परंतू ममता यांनी मोदींशी बोलणं टाळल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिली होती.

VIDEO | फनी वादळाची माहिती घेण्यासाठी पंतप्रधानांचा फोन, ममता बॅनर्जींनी बोलणं टाळलं | एबीपी माझा