नवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसकडून जोरदार प्रत्यूत्तर देण्यात येत आहे. 'गेल्या 5 वर्षातील सरकारच्या चुकांनाही राजीव गांधी जबाबदार आहेत का?' असा सवाल आता काँग्रेसकडून विचारण्यात येत आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेत मोदींच्या टीकेला उत्तर दिले आहे. सरकारच्या गेल्या 5 वर्षांतील गैरकारभारालाही राजीव गांधीच जबाबदार आहेत का? असा प्रश्न विचारत खेडा यांनी मोदींवर तोफ डागली आहे. शिवाय, काँग्रेस पक्ष बोफोर्सप्रकऱणी चर्चेला तयार आहे, त्याप्रमाणे मोदींनीही राफेल प्रकरणी चर्चा करण्याचं आव्हान खेडा यांनी मोदींना केलं आहे.
काँग्रेसनं राजीव गांधींच्या नावे निवडणूक लढवावी असं आवाहन काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केलं होतं. तसेच काल एका प्रचारसभेत मोदींनी सुट्टीसाठी राजीव गांधींनी पंतप्रधानपदी असताना युद्धनौका वापरल्याची टीका केली होती. त्यावर काँग्रेसकडून प्रत्यूत्तर देण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही "हयात नसताना राजीव गांधी यांच्यावर टीका होणं चांगलं नाही", अशी प्रतिक्रिया दिली आहे. "राजीव गांधींचा मृत्यू क्लेशदायक होता. गांधी परिवाराने दोन पंतप्रधान देशाला दिले. दोघांचीही हत्या झाली. एवढा मोठा त्याग या परिवाराने केल्यानंतर नरेंद्र मोदींची अशी भाषा शोभणारी नाही. आपण पंतप्रधान पदावर आहोत. या पदावर असताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र अशी काळजी न घेता अशा प्रकारची भाषा मोदींकडून बोलली जात आहे, हे दुर्दैवी आहे", असे पवार म्हणाले.
गेल्या 5 वर्षातील चुकांनाही राजीव गांधी जबाबदार आहेत का? काँग्रेसचा मोदींना सवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 May 2019 05:41 PM (IST)
सरकारच्या गेल्या 5 वर्षांतील गैरकारभारालाही राजीव गांधीच जबाबदार आहेत का? असा प्रश्न विचारत खेडा यांनी मोदींवर तोफ डागली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -