UP Elections 2022 : यावर्षात उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. अशातच राजकीय नेत्यांचे उत्तर प्रदेशमध्ये दौरे देखील वाढले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना राजकीय नेत्यांकडून विविध आश्वासने दिली जात आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील जनतेला एक आश्वासन दिले आहे. उत्तर प्रदेशमध्ये जर आमच्या पक्षाचे सरकार आले तर 300 युनीटपर्यंतची वीज मोफत दिली जाणार असल्याचे आश्वासन अखिलेश यादव यांनी दिले आहे. मात्र, त्यांच्या या आश्वासनावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली आहे.


अखिलेश यादव यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वीज मोफत दिली जाणार असल्याचेही यादव यांनी सांगितले आहे. तसेच 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये 'बाइसिकल' असे म्हणत आम्ही सत्तेत येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, अखिलेश यादव यांच्या या आश्वासनानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा लगावला आहे.


तुमच्या सरकारच्या काळात तुम्ही वीज देतच नव्हता, तर मोफत वीज देण्याची भाषा कशी करता? असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित केला आहे. याउलट जनतेकडून तुम्ही जी वसुली केली, त्यासाठी माफी मागा असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. सध्या कोणताही भेदभाव न करता हिंदू आणि मुस्लिम यांच्या घरात वीज मिळत असल्याचे सांगितले. रामपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यांच्यावर टीका केली. फुकटात वीज देणार असे ते म्हणत आहेत, मात्र, त्यांच्या सरकारच्या काळात त्यांनी जनतेकडून मोठ्या प्रमाणात वसुली केल्यचा आरोप योगी यांनी केलाय. सरकारने प्रत्येक माणसाला त्याचा हक्क दिला आहे. आधी वीज, शौचालयासाठी असणारा पैसा कुठे जात होता? असा सवालही त्यांनी केला आहे. 


यावर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. भाजपने तर निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणा केल्या आहेत. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही दौरा झाला आहे. अशातच  AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी देखील उत्तर प्रदेश निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच शिवसेनेनंही उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे.