नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएसई (CBSE)सह देशातील अनेक राज्यांच्या बोर्डांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत, तर काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. अशातच आता या याद्यांमध्ये ICSE बोर्डाचाही समावेश झाला आहे. आयसीएसई बोर्डानं दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दरम्यान, पहिल्यांदा दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आधी पर्यायी ठेवण्यात आली होती. दरम्यान, आयसीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा 4 मेपासून सुरु होणार होत्या. 


बारावीच्या परीक्षा यापूर्वीच स्थिगित


दरम्यान, यापूर्वी आयसीएसई (ICSE) बोर्डानं यापूर्वीच बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. बोर्डानं सांगितलं होतं की, सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असून नव्या तारखांची घोषणा केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, जुनमध्ये परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा करण्यात येणार आहे. 



दहावीची परीक्षा रद्द, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली, सीबीएसई बोर्डाचा निर्णय


देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. अशातच मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात होती. अखेर आज सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 4 मे पासून सुरु होणारी सीबीएसईची बारावीची परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आली आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेबाबत एक जूनला फेरआढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर किमान 15 दिवस आधी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीनंतर शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सीबीएसई परीक्षांसंदर्भात घोषणा केली. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरत होती. काँग्रेस, आम आदमी पार्टीसह अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. 


देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव 


देशात गेल्या 24 तासांत दोन लाख 59 हजार 170 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 20 लाखांच्या पार पोहोचली आहे. अशातच देशात 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारन घेतला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


SSC HSC Exam: सीबीएसई दहावी परीक्षा रद्द, राज्याचा शिक्षण विभाग दहावी बोर्ड परीक्षेबाबत काय निर्णय घेणार?