मुंबई : सीबीएसई दहावी बारावी परीक्षेबाबत मोठा निर्णय आज घेण्यात आला. यामध्ये यावर्षी सीबीएसई दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात तर बारावी बोर्ड परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्यात. आता या निर्णयाचा स्वागत एकीकडे सीबीएसई परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून केलं जातं असलं तरी राज्यातील शिक्षण विभागाने दहावी बोर्ड परीक्षेबाबत सुद्धा अशाप्रकारे निर्णय घ्यावा,असे विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं आहे. सोबतच, सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द आणि राज्यातील दहावी बोर्ड परिक्षा घेतल्या जात असतील तर अकरावी प्रवेशावेळी गुणांची दरी दोन बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढणार? असा सुद्धा प्रश्न समोर येतोय.


आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्वाच्या बैठकीत सीबीएसई दहावी बारावी बोर्ड परिक्षेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. अनेक राज्यातून शिवाय, देशातील मोठ्या राजकीय नेत्यांकडून सीबीएसई बोर्ड परीक्षेबाबत केल्या जाणाऱ्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आली तर  बारावी बोर्ड परीक्षा 4 मे ऐवजी आता पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे, दहावी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना ऑब्जेकटिव्ह क्रायटेरिया तयार करून अंतर्गत मूल्यपमाननुसार गुण देऊन पास केले जाणार आहे. 


आता केंद्र सरकार सीबीएसई बोर्ड परीक्षेबाबत एवढा मोठा निर्णय घेत असेल तर नक्कीच काही प्रश्न समोर येत आहेत. जर सीबीएसई बोर्ड दहावी बोर्ड परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पास करणार असेल तर राज्याचा शिक्षण विभाग, एसएससी (स्टेट बोर्ड ) असा निर्णय घेण्याची तयारी दाखवणार का? सीबीएसई बोर्ड दहावी परीक्षा रद्द करत असेल आणि राज्याचा शिक्षण विभाग दहावी परीक्षा घेणार असेल तर अकरावी प्रवेशावेळी गुणांची दरी वाढणार का? त्याचा फटका राज्यातील दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार का? देशाचा कोरोना परिस्थितीचा विचार करून जर सीबीएसई दहावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या जात असतील तर मग महाराष्ट्र जे कोरोनाच्या रुग्ण संख्येत देशात पहिल्या क्रमांकावर आहे त्या राज्यात विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा विचार केला जाणार का? सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा रद्द होऊन विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अंतर्गत गुणांमुळे होणारा फायदा आणि दुसरीकडे ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करून राज्यात दहावी परीक्षा घेऊन मिळणारे गुण यामध्ये तफावत वाढल्यास राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होईल का? असे अनेक महत्वाचे सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत. 


याबाबत राज्यातील शिक्षण विभागाने दहावी बारावी बोर्ड परीक्षा या सध्यातरी घेतल्या जाणार असून त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याच सांगितले. मात्र, सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा रद्द करत असेल तर राज्य सरकार व राज्याचा शिक्षण विभाग कोरोनाची सद्यस्थिती पाहता दहावी परीक्षा रद्द करण्याबाबत लवकर विचार करून निर्णय घेणार की परीक्षा घेणारच? याबाबत स्पष्टता करणं गरजेचं आहे. 


सध्यातरी राज्यातील शिक्षण विभागाने दहावी बारावी बोर्ड परीक्षा मे आणि जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आज सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे राज्याचा शिक्षण विभाग आता बोर्ड परीक्षेबाबत काय निर्णय घेत? विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन दहावी बोर्ड परीक्षा सीबीएसई बोर्डाप्रमाणे रद्द करतात का ? हे पहावं लागेल.


काय म्हणाल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी


कोरोनाच्या परिस्थितीत सीबीएसईच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली होती. परीक्षा रद्द झाल्यानंतर गांधी यांनी ट्वीट करत घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. प्रियांका गांधी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या की, "सरकारने दहावीची परीक्षा रद्द केली या निर्णयामुळे मी आनंदी आहे. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. जून पर्यंत विद्यार्थ्यांना दबावाखाली ठेवण्यात काही अर्थ नाही. हे अयोग्य आहे. बारावी परीक्षेसंदर्भात देखील सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा."







सीबीएसईसारख्या बोर्डांनी विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत परीक्षा द्यायला भाग पाडणं बेजबाबदारपणाचं आहे.सध्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा परीक्षा पुढे ढकलून नवं वेळापत्रक जारी करावं, अशी मागणी प्रियांका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. पंतप्रधानांनी आणि शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील गोष्ट समजावी आणि परीक्षा घेण्याचा हट्ट सोडावा, असे देखील त्या म्हणाल्या होत्या. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI