नवी दिल्ली : साल 2016 मध्ये यूपीएससी (UPSC) परीक्षेत टॉप केल्यामुळे चर्चेत आलेले राजस्थान केडरचे दोन आयएएस (IAS) अधिकारी टीना डाबी आणि अतहर आमीर उल शफी खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. टीना यांनी केंद्रीय लोकसेवा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला होता, तर जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या अतहरने त्याच परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. या दोन्ही टॉपर्सना राजस्थान केडर मिळाला आणि वर्ष 2018 मध्ये दोघांचे लग्न झाले. केवळ दोन वर्षातच हे दोन तरुण आयएएस अधिकारी देशभरात चर्चेत आले होते.


पहिल्यांदा सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत अव्वल आल्याने दुसऱ्यांदा लग्न झाल्यामुळे ही जोडी चर्चेत आली. आता पुन्हा दोन वर्षांनंतर हे दोन्ही अधिकारी चर्चेत आहेत. पण यावेळी त्यांचे लग्न मोडण्याबाबत चर्चा सुरू आहे. टीना आणि अतहर यांची सध्या जयपूरमध्ये नियुक्ती आहे. टीना यांची शुक्रवारी जयपूरमधील सचिवालयातील वित्त विभागात श्री गंगानगर येथून बदली झाली आहे, तर अतहर यांची आधीपासूनच जयपूरमध्ये पोस्टींग आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आता टीना डाबी आणि अतहार एकत्र राहू इच्छित नाहीत. म्हणून या दोघांनी परस्पर संमतीने जयपूरच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज या महिन्याच्या 17 तारखेला कौटुंबिक कोर्टाचे न्यायाधीश झुमर लाल यांच्याकडे दाखल केला आहे. या दोघांमधील संबंध बिघडण्याची प्रक्रिया सुमारे एक वर्षापूर्वी सुरू झाली, जेव्हा दोघे राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात नियुक्त होते.


नागरी सेवेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या या दोन तरुण अधिकाऱ्यांमधील नातेसंबंधांमध्ये धुसफूस होत असल्याच्या बातम्या येत होत्या. जेव्हा राज्य सरकारने वेगवेगळ्या जिल्ह्यात या दाम्पत्याची पोस्टींग केली. तेव्हा सर्वांना समजले की, यांच्या नात्यात मोठा दुरावा निर्माण झाला आहे. टीना आणि अतहर यांनी वर्ष 2018 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये लग्न केले होते. तेव्हा टीनाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर स्वत: ला काश्मिरी सून म्हणूनही ओळख करून दिली होती.


पण आता दोन वर्षांत हे नातं संपण्याच्या मार्गावर आहे. टीना आणि अतहर यांनी कलम 13 बी अंतर्गत अर्ज दाखल केला असून त्या अंतर्गत परस्पर संमतीने लग्न बंधनातून वेगळं होण्याची तरतूद आहे. अतहर हा काश्मीरमधील मुस्लीम असून टीना डाबी मूळची मध्य प्रदेशातील हिंदू कुटुंबातील आहे.