नवी दिल्ली : राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट काँग्रेस सोडणार की नाही नाही याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. कारण सचिन पायलट काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असं स्पष्टीकरण खुद्द सचिन पायलट यांनीच दिलं आहे. एबीपी न्यूजच्या प्रतिनिधीने सचिन पायलट यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी पायलट यांनी हे स्पष्ट केलं.
एबीपी न्यूजचे प्रतिनिधी आदेश रावल यांनी सचिन पायलट यांच्याशी बोलताना आपण कधीही भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असं म्हटलं. आदेश रावल यांची काल रात्री उशिरा सचिन पायलट यांच्याशी फोनवरुन बातचीत झाली, त्यावेळी पायलट यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याची माहिती दिली.
काँग्रेस आमदारांची आज बैठक
आज म्हणजे सोमवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सकाळी साडेदहा वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. विशेष म्हणजे या बैठकीला दिल्लीहून निरीक्षकही येणार आहेत. या बैठकीत सचिन पायलट सहभागी होणार नसल्याचं कळतं. दरम्यान विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी न झाल्यास सचिन पायलट यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली जाणार आहे. योग्य उत्तर न मिळाल्यास त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस अध्यक्षांकडे केली जाण्याची शक्यता आहे.
30 आमदारांचे समर्थन असल्याचा पायलट यांचा दावा
माझ्याकडे 30 आमदाराचं समर्थन असून राजस्थानचे अशोक गहलोत यांचे सरकार अल्पमतात असल्याचे काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले. कोणत्या 30 आमदारांचे समर्थन आहे, हे मात्र समजू शकले नाही. दुसरीकडे काँग्रेस सूत्रांनी रविवारी रात्री अशोक गहलोत यांच्या बैठकीत 90 आमदारांची उपस्थिती असल्याचा दावा केला आहे.
राजस्थान विधानसभेतील पक्षीय बलाबल
राजस्थान विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. बहुमतासाठी 101 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे 107 आमदार आहेत. तर भाजपकडे 72, इतर आणि अपक्षांचे 21 आमदार आहेत.
संबंधित बातम्या
Sachin Pilot | सचिन पायलट यांचे बंडाचे सूर, भाजप 'वेट अॅण्ड वॉच'च्या भूमिकेत!
Sachin Pilot | राजस्थानात सचिन पायलट यांच्या नाराजीनंतर आज विधीमंडळ पक्षाची बैठक