लंडन : एकेकाळी देशातील टॉपच्या उद्योजकांमध्ये समावेश असलेल्या अनिल अंबानी यांची आर्थिक परिस्थिती अशी झालीय की वकिलांची फी भरण्यासाठी त्यांच्यावर दागिने विकण्याची वेळ आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली असलेले उद्योजक अनिल अंबानी यांनी इंग्लंडमधील कोर्टात ही माहिती दिली. त्यांनी कोर्टात सांगितलं की, "मी एक सर्वसामान्य आयुष्य जगत असून सध्या माझा खर्च पत्नी टीना अंबानी करत आहे. तसंच माझ्याकडे फक्त एकच कार आहे."


इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना लिमिटेड, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्जिम बँक ऑफ चायनाने अनिल अंबानीविरोधात ब्रिटनच्या न्यायालयात दाद मागितली आहे. अनिल अंबानी यांनी आपल्या संपत्तीची माहिती जाहीर करण्याची मागणी चिनी कंपन्यांनी बँकांनी कोर्टाकडे केली होती.


व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनिल अंबानी शुक्रवारी लंडनमधील उच्च न्यायालयासमोर हजर राहिले. यावेळी जवळपास तीन तास प्रश्नउत्तरं विचारण्यात आली. संपत्ती, कर्जदार आणि खर्चांबाबतची माहिती त्यांना विचारण्यात आली.


सहा महिन्यात 9.9 कोटी रुपयांचे दागिने विकले : अंबानी
अनिल अंबानी यांनी सांगितलं की, "या वर्षी जानेवारीपासून जूनदरम्यान मी 9.9 कोटी रुपये किंमतीचे दागिने विकले असून आता माझ्याकडे विकण्यासारख्या मौल्यवान वस्तू शिल्लक राहिलेल्या नाहीत. ताफ्यातील लक्झरी कारबाबत प्रश्न विचारलं असता ते म्हणाले की, "ही फक्त मीडियामधील अफवा आहेत. माझ्याकडे कधीही रॉल्स रॉयस नव्हती. मी सध्या एकाच कारचा वापर करत आहे."


संपत्तीची माहिती देण्याचे कोर्टाचे अंबानींना निर्देश
यूके हायकोर्टने 22 मे, 2020 रोजी अनिल अंबानी यांना 12 जून, 2020 पर्यंत चीनच्या तीन बँकांना 71,69,17,681 डॉलर (सुमारे 5,281 कोटी रुपये) कर्जाची रक्कम आणि 50,000 पौंड (सुमारे 7 कोटी रुपये) कायदेशीर खर्चाच्या रुपाने फेडावेत असं सांगितलं होतं. यानंतर 15 जून रोजी इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायनाच्या नेतृत्त्वात चिनी बँकांनी अनिल अंबानींनी संपत्तीची माहिती द्यावी अशी मागणी केली होती.


29 जून रोजी मास्टर डेविसन यांनी अनिल अंबानींना प्रतिज्ञापत्राद्वारे जगभरातील आपल्या संपत्तीची माहिती देण्याचा आदेश दिला होता. तसंच या संपत्तीचा मालकी हक्क संपूर्ण त्यांचाच आहे की भागीदार आहेत, असंही प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.


कोर्टाच्या आदेशावर अनिल अंबानींकडून परिस्थितीचं वर्णन
या आदेशानंतर कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अनिल अंबानी यांनी सांगितलं की, त्यांनी रिलायन्स इनोव्हेंचर्सला 5 अब्ज रुपयांचं कर्ज दिलं होतं. रिलायन्स इनोव्हेंचर्समध्ये 1.20 कोटी इक्विटी शेअरची फारशी किंमत नाही. आपल्या कौटुंबिक ट्रस्टसह जगभरात कोणत्याही ट्रस्टमध्ये त्यांचं कोणतंही आर्थिक हित नाही.