हैदराबाद : एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने 25 वर्षीय विवाहितेची पती आणि सासू-सासऱ्यांनी हत्या केल्याचा आरोप होत आहे. विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीसह त्याच्या पालकांना बेड्या ठोकल्या आहेत.


हैदराबादजवळ एलबी नगरमधल्या रॉक टाऊन कॉलनीत ही घटना घडली. मयत हरिका कुमारचा पती ऋषीने रविवारी रात्री तिच्या आईला फोन केला. हरिकाने स्वतःला पेटवून घेतल्याचं ऋषीने तिच्या आई-वडिलांना सांगितलं. मात्र हरिकाचा हुंड्यासाठी छळ करुन, कट रचत हत्या केल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.

हरिकाने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या पतीने केला आहे, मात्र घटनास्थळी दाखल झाल्यावर हे हत्याकांड असल्याचा प्राथमिक अंदाज आम्ही वर्तवला, असं एसीपी वेणूगोपाल राव यांनी सांगितलं.

हरिका वैद्यकीय प्रवेश परीक्षा पार करण्याचा प्रयत्न करत होती, मात्र याही वर्षी तिला यश आलं नाही. तिने एका खाजगी महाविद्यालयात बीडीएससाठी प्रयत्न केले होते. मात्र पतीचा तिच्यावर विश्वास नव्हता. तो तिला वारंवार घटस्फोट देण्याची धमकी देत होता, असा दावा हरिकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

'दोन वर्षांपूर्वी हरिका आणि ऋषी विवाहबंधनात अडकले होते. एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्याने तो तिला छळत होता. तिला या वर्षी बीडीएससाठी प्रवेश मिळाला. त्यातच तो हुंड्यासाठी त्रास देऊ लागला. ही सुनियोजित हत्या आहे.' असं हरिकाची आई आणि बहीण म्हणाली.

हरिकाचा मृत्यू कसा झाला, हे ऑटोप्सीनंतर समजेल, असं पोलिस म्हणाले. तिची गळा आवळून हत्या केल्यानंतर तिला जाळलं का, हे अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिस तिच्या मृत्यू प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.