हैदराबाद : साडी म्हणजे तमाम महिलावर्गाचा वीकपॉईन्ट. साडी खरेदीच काय, पण त्याच्या विंडो शॉपिंगमध्येही महिलांचा तासतासभर वेळ जातो. आवडीचा रंग, डिझाईन आणि त्यावर मॅचिंग अॅक्सेसरिज मिळाल्या की कळी खुललीच म्हणून समजा. मात्र फुकटात मिळालेली साडी आवडली नाही, तर काय होऊ शकतं ते तेलंगणात पाहायला मिळालं.


तेलंगणा सरकारनं नवरात्रीनिमित्त साजरा होणाऱ्या बथुकम्मा उत्सवासाठी महिलांना मोफत साडीवाटप सुरु केलं. हैदराबादजवळच्या सैदाबादमध्ये हे साडीवाटप सुरु होतं. फुकट मिळतंय म्हटल्यावर काही महिलांनी दोन्ही हातांनी ओरबाडण्याला सुरुवात केली. त्यातच रांगेत घुसखोरी करणाऱ्यावरुन वादाला सुरुवात झाली आणि सुरु झाला राडा.

महिलांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, लाथा-बुक्क्यांनी मारलं आणि एकमेकींना जमिनीवर लोळवलं. विशेष म्हणजे ही मारामारी रोखण्याचे महिला पोलिस कर्चमाऱ्याचे प्रयत्नही अपुरे पडले. महिलांना साडीचं डिझाईन न आवडल्याने ही फायटिंग सुरु झाल्याचं काही जणांनी सांगितलं.

तेलंगणा सरकारने तब्बल 222 कोटी रुपये खर्च करुन एक कोटी महिलांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे.