हैदराबाद : हैदराबाद महापालिका निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. आतापर्यंतचे कल पाहता असदुद्दीन ओवेसींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हैदराबादमध्ये मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये मागे असलेल्या टीआरएसने जोरदार मुसंडी घेतली आहे. कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला होता. परंतु हळूहळू टीआरएसचं वर्चस्व वाढलं आणि भाजप पक्ष दुसऱ्या स्थानावर गेला. तर कलांमध्ये ओवेसेंचा पक्ष एमआयएम तिसऱ्या क्रमांकावर आहे.


कलांमध्ये सत्ताधारी टीआरएस 66 जागांवर आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजप असून 40 जागांवर आघाडी घेतली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या 34 जागांवर आघाडी मिळवली आहे.


150 जागांच्या हैदराबाद महापालिकेसाठी  1 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरद्वारे मतदान पार पडलं होतं. त्यामुळे संपूर्ण निकालाचं चित्र संध्याकाळी किंवा रात्री स्पष्ट होईल. जीएचएमसी निवडणुकी 1122 उमेदवार रिंगणात आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मतमोजणीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. 30 ठिकाणी मतमोजणी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मागील निवडणुकीत टीआरएसने महापालिकेवर ताबा मिळवला होता.


निवडणूक प्रचारात सर्वच पक्षांनी जोर लावला होता. भाजपने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जबरदस्त प्रचार आणि प्रसार केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हैदराबादमध्ये जाऊन प्रचार केला होता.


हैदराबाद महापालिका निवडणूक का महत्त्वाची?
ग्रेटर हैदराबाद महापालिका (GHMC) देशातील सर्वात मोठ्या महापालिकांपैकी एक आहे. ही महापालिका चार जिल्ह्यांमध्ये आहे, ज्यात हैदराबाद, मेडचल-मलकजगिरी, रंगारेड्डी आणि संगारेड्डीचा समावेश आहे. संपूर्ण परिसरात 24 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर तो तेलंगणाचे पाच लोकसभा मतदारसंघ यात समाविष्ट आहेत. यामुळेच हैदराबाद महापालिका निवडणुकीत केसीआर यांच्यासह असदुद्दीन ओवेसी, भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


मागील निवडणुकीत टीआरएसला बहुमत
2016 मध्ये झालेल्या हैदराबाद महापालिका निवडणूक निकालात टीआरएसने 150 पैकी 99 जागांवर विजय मिळवला होता. तर असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष AIMIM ला 44 जागां मिळाल्या होत्या. भाजपला केवळ तीन जागांवर विजय मिळवता आला होता. तर काँग्रेसच्या खात्यात दोनच जागा जमा झाल्या होत्या.